पाणवठ्याअभावी वन्य प्राण्यांची भटकंती
पिंपळगाव सराई : वनपरिसरात वन्यजीवांची संख्या भरपूर आहे. मात्र वनपरिसरात पाणवठे नसल्याने वन्य प्राण्यांची भटकंती होत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुक्त गाव स्पर्धेकडे लक्ष
बुलडाणा: ग्रामीण भागात कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील यशस्वी गावांना विकासकामांसाठी भरघोस निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष कोरोनामुक्त गाव स्पर्धेकडे लागले आहे.
लोणार तालुक्यात २१ पॉझिटिव्ह
लोणार: तालुक्यात गुरुवारी २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. तर जे रुग्ण गंभीर आहेत, अशांना बुलडाणा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
नदी खोलीकरण, रुंदीकरणाचा प्रश्न
देऊळगाव मही: कोरोनामुळे अनेक कामे रखडली आहेत. नदी खोलीकरण, रुंदीकरणाच्या कामाचाही प्रश्न निर्माण होत आहे. खोलीकरणामुळे पाण्याचे स्त्रोत जिवंत होण्यास याचा फायदा होणार आहे. ग्रामीण जीवनाचा श्वास असणाऱ्या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.
पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याची गरज
बुलडाणा : खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच पीक कर्ज वाटपाची गती तुलनेने संथ असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून दुष्काळाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती मशागतीसह, पेरणीसाठीचे बी-बियाणे खरेदीसाठी सध्या पैशाची गरज आहे. त्यानुषंगाने पीक कर्जाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
सुंदरखेड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा
बुलडाणा : तालुक्यातील सुंदरखेड येथे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आला आहे. सुंदरखेड येथील १३ हजार ३१७ लोकसंख्येकरिता एक टँकर मंजूर करण्यात आला आहे. हा टँकर दररोज २ लक्ष ६२ हजार ९४० लिटर पाण्याचा पुरवठा करत आहे.
रिक्त पदांची समस्या
सिंदखेडराजा: तालुक्यात साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, किनगावराजा आणि अडगावराजा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यापैकी बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात एलपीडब्ल्यूची अनेक पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवक आणि शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
बियाणे महामंडळाच्या कार्यालयासमोर रांगा
बुलडाणा: कंपनीच्या बियाणापेक्षा महाबीजचे बियाणे परवडत असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. यावेळी बियाणे कमी असल्याने आणि सर्वांना ते मिळू शकणार नसल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे.
आज राष्ट्रवादीची आढावा बैठक
बुलडाणा: राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक ४ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष यांची या बैठकीला उपस्थिती राहणार आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येत आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी मुळे
बुलडणा: सरपंच परिषदेच्या समन्वयकांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. त्यामध्ये सरपंच परिषदेच्या विदर्भ समन्वयकपदी शाम जैस्वाल व बुलडाणा जिल्हा समन्वयकपदी बिरसिंगपूरचे उपसरपंच राजू मुळे आणि हिवरा गडलिंगचे सरपंच पूजन अनंता खरात यांची निवड करण्यात आली आहे.
मेहकर परिसरात चाराटंचाईचे संकट
मेहकर : शहरासह ग्रामीण भागात चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कडब्याचे भाव वाढले आहेत. अनेक ठिकाणी पशुपालकांना चारा मिळत नसल्याची ओरड आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
रेती चोरीकडे प्रशासनाचे लक्ष
सिंदखेडराजा: तालुक्यात तीन अधिकृत रेती घाट सुरु आहेत. परंतु अनेक ठिकाणावरून रेती चोरी सुरूच होती. त्यामुळे महसूल प्रशासनाने आता रेती चोरीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने नदी कडून येणारे वाळू चोरीचे मार्ग बंद केल्याने रेती चोरट्यांची तारांबळ उडाली आहे.