बांधकामाचे नियोजन हुकले
बुलडाणा: सिमेंटच्या एका बॅगचे दर जानेवारीमध्ये ३३० रुपये होते. आता एका बॅगसाठी ४०० रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सिमेंटबरोबरच सळईचे भावही वाढले आहेत. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरातील वाढीमुळे बांधकामाचे नियोजन हुकले आहे.
गावरान आंब्याच्या उत्पादनात घट
दुसरबीड : यावर्षी गावरान आंब्याचे उत्पादन कमी झाल्याने गावरान आंब्याचा गोडवा हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खवय्यांना यावर्षी रसाळीची मजा कमी प्रमाणात चाखायला मिळत आहे. त्यात लॉकडाऊन लागल्याने इतर आंबे खरेदी करण्याचे प्रमाणही कमी आहे.
ग्रामीण भागात नालेसफाईला वेग
मेहकर : मोठ्या ग्रामपंचायतीच्यावतीने मान्सूनपूर्व नाल्यांच्या सफाईचे काम सध्या वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे नियोजन दिसून येत आहे.
बियाणांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक
हिवरा आश्रम : खरीप हंगाम जवळ आला आहे. मेहकर तालुक्यात सोयाबीन या पिकाचा पेरा जास्त असतो. शेतकरी घरचेच बियाणे जास्त प्रमाणात वापरतात. मात्र हे बियाणे पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणे महत्त्वाचे असते. याकरिता कृषी सहायकांकडून उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक सुरू करण्यात आले आहे.
जंतुनाशक फवारणीची गरज
किनगाव राजा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनीही वैयक्तिक स्वच्छता राखून काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
काम नसल्याने मजुरांची आर्थिक परवड
सुलतानपूर : ‘लॉकडाऊन'मध्ये हाताला काम नसल्याने येथील मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.
मक्याला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत
धामणगाव बढे : दरवर्षीच्या तुलनेत यंदा मक्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. गेल्यावर्षी २ हजारांपर्यंत भाव होता. यावर्षी अत्यंत कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंब चिंतेत सापडले आहे.
क्वारंटाईन नागरिकांनी घरातच थांबावे
देऊळगाव मही : परिसरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित नागरिक सापडत आहेत. लक्षणे नसलेले नागरिक घरातच क्वारंटाईन आहेत. त्यांनी घराबाहेर पडू नये, घरातच थांबावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना नियंत्रण समिती नावाला
देऊळगाव राजा : कोरोनाचा वाढता संसर्ग बघता, गावा-गावात कोरोना नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र बहुतांश गावांमध्ये कोरोना नियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे समिती केवळ नावालाच राहत आहे.
रेती वाहतुकीने रस्त्यांची दुरवस्था
देऊळगाव मही : डिग्रस बु. परिसरात रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. डिग्रस बु.पासून पाबळपर्यंत रस्त्यावरील डांबर उखडले आहे. या रस्त्यावर सतत रेतीची टिपरद्वारे वाहतूक होत आहे. रस्त्याची क्षमता कमी आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतूक दररोज होते. अंदाजे २५ ते ३० टनपेक्षा जास्त भरलेले रेती टिपर दररोज शेकडोच्या संख्येत वाहतूक करतात. अनेक ठिकाणच्या रस्त्यावरील पूर्ण डांबर उखडलेले दिसून येत आहे.