चिखली तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या एकूण २०२ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी २३ डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी अर्ज भरण्यासाठी प्रतिसाद मिळाला नाही. निवडणुकीस इच्छुक उमेदवारांनी २४ डिसेंबरनंतर अर्ज भरण्यास सुरुवात केली. या दिवशी ९ उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले होते. २८ डिसेंबर रोजी १३७ उमेदवारांचे १४० अर्ज, २९ डिसेंबरला ५२६ उमेदवारांचे ५३८ अर्ज आणि ३० डिसेंबरला ७७५ उमेदवारांचे ७९८ अर्ज अशा एकूण १ हजार ४४७ उमेदवारांनी १ हजार ४८७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३१ डिसेंबर रोजी या छाननीअंती १२ उमेदवारांचे १२ अर्ज नामंजूर झाले. सद्यस्थितीत १ हजार ४३५ उमेदवारांचे १ हजार ४७५ उमेदवारी अर्ज आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात सर्वत्र विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. गावागावात बैठका, गाठीभेटी व शह-कटशहाच्या राजकारणाने वातावरण चांगलेच तापलेले आहे.
आदर्श गाव ‘खोर’ची निवडणूक बिनविरोध !
तालुक्यातील आदर्श गाव म्हणून नावारुपास आलेल्या खोर या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊ घातली आहे. ग्रामस्थांनी सर्वांच्या संमतीने सरपंचपदासाठी दीपक पांडुरंग हाके यांचे नाव पुढे केले आहे. तर सदस्यपदासाठी दीपक देवराव पांडे, गोपालसिंग धुनावत, राजभाऊ बाबुराव गायकवाड, राहुल सावळे, नितीन अंभोरे आणि सचिन मोरे यांची निवड निश्चित मानली जात आहे. मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आ. श्वेता महाले यांनी देखील पुढाकार घेत अशा गावांना २१ लाखांच्या विकास निधीची घोषणा केलेली आहे. यास खोर ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.