लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६७.६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. रविवारी रात्रीपासून सर्वत्र पाऊस सुरू असल्याने प्रकल्पांमधील जलसाठा वाढण्यास त्यामुळे मदत झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामध्ये सिंदखेड राजा व लोणार या भागात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे छोटे-मोठे तलाव भरले आहेत.बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची रीपरीप सुरू आहे. रविवारी रात्रीपासून या पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५.६५ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर गेल्या २४ तासामध्ये १४.९ मि.मी. पाऊस झाला असून, दोन टक्याने वाढ यामध्ये झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात एकाच दिवशी ३६.९ मि.मी. व लोणार तालुक्यात ३१.६ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत ६७.६० टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. या संततधार पावसामुळे काही भागातील छोटे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे काही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
२४ तासातील तालुकानिहाय पाऊस१६ आॅगस्ट ते १७ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात ७.२ मि.मी., चिखली २८.६ मि.मी, देऊळगाव राजा १४.९, सिंदखेड राजा ३६.९, लोणार ३१.६, मेहकर २१.८, खामगाव ६.८, शेगाव ५.०, मलकापूर ६.५, नांदूरा ७.५, मोताळा ६.७, संग्रामपूर १५.३ व जळगाव जामोद तालुक्यात ४.४. मि.मी. पाऊस झाला आहे.