ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाराष्ट्र क्षयरोगमुक्त करण्यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये क्षय रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. १७ जुलैपासून या मोहिमेस प्रारंभ करण्यात येणार असून, ३१ जुलैपर्यंत १५ जिल्ह्यांतील घरोघरी क्षय रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जोखमीच्या गावामध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका लिंक वर्कर, नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका घरोघरी भेटी देऊन संशयित क्षय रुग्णाची तपासणी करणार आहेत. दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त मुदतीचा ताप, मागील तीन महिन्यांत वजनामध्ये लक्षणीय घट, मागील सहा महिन्यांच्या कालावधीत थुंकीवाटे रक्त पडणे, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे अशा रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या जिल्ह्यात राबविणार मोहीम!राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये १५ दिवस क्षय रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये बुलडाणा, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर, नवी मुंबई, सांगली, सोलापूर एम.सी., ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.सीबीनॅट मशीनद्वारे होणार तपासणी!क्षय रुग्ण शोधमोहिमेदरम्यान घरोघरी फिरल्यानंतर आढळून आलेल्या संशयित क्षय रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, तसेच आवश्यकता भासल्यास रुग्णांची सीबीनॅट मशीनद्वारे तपासणीही करण्यात येणार आहे.
राज्यातील १५ जिल्ह्यांत होणार क्षय रुग्णांचा शोध!
By admin | Published: July 17, 2017 3:33 AM