खामगाव: कमी किंमतीत सोन्याची नाणी देण्याचे आमिष देऊन नागपूर येथील एका इसमाची फसवणूक करण्यात आली. खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनतंर्गत हा धक्कादायक प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, मोहमद सफीर अहमद अकील अहमद (३७) यांनी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या फेसबुकवर गाडी विक्री करण्याची पोस्ट टाकली. ही पोस्टपाहून खामगाव तालुक्यातील एकाने त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यांच्यात ओळख झाल्यानंतर व्हॉटसअप चॅटींग देखील सुरू झाली. दरम्यान, काही दिवसांनी चॅटींग करणार्याने मोहमद सफीर याला कमी किंमतीत सोन्याची नाणी हवी असतील तर आपण कमी किंमतीत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. कमी किंमतीतील नाण्याच्या आमीषापोटी भामट्यावर विश्वास ठेवून नागपूर येथील व्यक्ती खामगाव येथे आला. त्यावेळी त्याला भामट्याने दोन खरी नाणी दाखविली. या नाण्याची तपासणी केल्यानंतर त्या खर्या आढळून आल्या. भामट्यावर विश्वास बसल्याने मो.सफीर यांनी पैशांची जुळवाजुळव करून १५ लाख रूपयांच्या नाणी खरेदी करण्याचा सौदा केला. सौदा पक्का झाल्यानंतर भामट्याने मो.सफीर यांना खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे बाेलाविले. त्याठिकाणी नकली नाणी असलेली थैली त्यांना दिली. दरम्यान, शंका आल्याने भामट्याला नाणी खरी असल्याबाबत प्रश्न केला. त्यावेळी िचडून जात त्याने मो.सफीर यांना लोटपाट केली. रक्कम असलेली बॅग आणि मोबाईल हिसकावून घेत भामटा पसार झाला. त्यावेळी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्याकडील शस्त्राने खूपसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी भामट्या विरोधात भादंवि कलम ३८२, ३९२,४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.