बुलडाणा, दि. २७-अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्काचे सन २0१६-१७ चे १५ हजार ५७८ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत. शिष्यवृत्तीच्या प्रलंबित अर्जाबाबत २८ फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणार आहे. ज्या महाविद्यालयांकडून वेळेत कार्यवाही केल्या जाणार नाही, अशा महाविद्यालयांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, तरी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याबाबत गंभीर होऊन सहकार्य करावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावे, महाविद्यालय स्तरावर २३ फेब्रुवारी पयर्ंत प्रलंबित असलेले अर्ज १५ मार्चपयर्ंत सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे ऑनलाइन तसेच हार्डप्रतीसह सादर करण्याची तत्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांना यापूर्वी कळविण्यात आले होते; मात्र महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांच्या स्तरावर अर्ज प्रलंबित ठेवले आहेत.प्रलंबित असलेले, पडताळणी न केलेले अर्ज छाननी व पडताळणी करून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे तत्काळ सादर करण्यात यावे. शिष्यवृत्ती मिळण्यापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास व विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील. वारंवार सूचना देऊनही प्रलंबित अर्जांची संख्या प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. सदर अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र असल्याची माहिती यामुळे कार्यालयाला मिळत नाही; पात्र असलेले अर्ज महाविद्यालयांनी तत्काळ विद्यार्थ्यांच्या पात्रतेची खात्री करून प्रपत्र ब तसेच प्रथम वर्षाचे आरक्षण प्रवर्गाच्या हार्ड प्रती, व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शासकीय कोट्यातील प्रवेश असल्याचे डी.टी.ई चे प्रमाणीत याद्यांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांनी केले आहे.
शिष्यवृत्तीचे १५ हजार ५७८ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित
By admin | Published: February 28, 2017 1:51 AM