अशाेक इंगळे /साखरखेर्डा : प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून १५ महिला कर्मचारी २३ खेड्यातील संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी करून आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत साखरखेर्डा, शेंदुर्जन, राजेगाव, सवडद, शिंदी, गुंज ही उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रात डाॅ. राखी सुरुशे, डॉ. अर्चना ठोसरे, डॉ. जयश्री शेळके, डॉ. बेबी राहाटे या महिला रुग्णांची सेवा करतात. विशेष म्हणजे कोरोना संसर्गजन्य आजार फैलावत असताना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांचा अहवाल पाठविण्याचे काम त्या करतात. घरातील लहान मुले, पती यांच्यापासून कित्येक दिवस विभक्त राहण्याची वेळ आली तरी रुग्णांची सेवा त्या सतत करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हिड तपासणी सुरु केली तेव्हापासून स्वाती इंगळे, कविता इंगळे, दीपाली पिठलोड, स्वाती डोंगरदिवे, मीनाक्षी गवई, अर्चना नेवरे, सुषमा जाधव, प्रमिला कांबे, अस्मिता पारधे, ज्योती चांगाडे, अर्चना कऱ्हाळे या आरोग्य सेविका कोरोना स्लॅब घेऊन तपासणीकरिता पाठवितात. आपली, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेत या कोरोना योध्दा म्हणून काम करीत आहेत.
१५ महिला करतात कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:32 AM