संग्रामपूर : काथरगाव पिंप्री येथे लेंडी व पांडव नदीचा संगम आहे. त्यामुळे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. नदीकाठावरील ३० घरांच्या वस्तीला पुराने वेढा घातल्याने सुमारे १५० नागरिक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले. पथक दाखल होण्यापूर्वी पुराचे पाणी ओसरल्याने ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
पथकाने अपंग, विकलांग, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढले. बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांना समाजमंदिर, मारोती मंदिर, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले. या ठिकाणीच राहणे व खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांवर उपचार करण्यासाठी एक वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. या वस्तीच्या एका बाजूला नदी तर दुसऱ्या बाजूला नाला असल्याने पूर्ण वस्तीला पुराचा फटका बसला आहे. वस्तीतील नागरिकांनी एका घराच्या छतावर आश्रय घेतला. मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काथरगाव पिंप्री गाव जलमय झाले. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
काथरगाव पिंप्री येथे पुरात अडकलेल्या १५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.- योगेश्वर टोंपे, तहसीलदार, संग्रामपूर