विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : जून महिन्याला प्रारंभ झाला असून पाऊस पडल्यानंतर पेरणीला प्रारंभ होणार आहे. पीककर्ज वाटपात बॅंकांची गती अत्यंत धीमी असून, शेतकर्यांना विविध कागदपत्रे गोळा करण्याकरिता बॅंकांच्यावतीने त्रास देण्यात येत आहे. जिल्ह्यात पीककर्जाचे १५०० कोटींचे उदिष्ट, केवळ २४४ कोटींचे वितरण करण्यात आले आहे.
खरीप हंगामात पेरणी करण्याकरिता दरवर्षी बॅंकांच्यावतीने शेतकर्यांना एका वर्षाकरिता बिनव्याजी पीककर्ज देण्यात येते. पूर्वी शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत होते. यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. बॅंकाकडून बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकर्यांना बराच लाभ मिळाला आहे. मुदतीच्या आत शेतकर्यांनी जुने कर्ज भरल्यावर नवीन कर्ज देण्यात येते. यावर्षी बुलढाणा जिल्ह्याला १५०० कोटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. जून महिन्याच्या २ तारखेपर्यंत जिल्ह्यात २४४ कोटींचे वाटप करण्यात आले. यात यावर्षी पीक कर्ज वाटपाची गती नगण्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून केंद्र आणि राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा. ३० जून पूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याज लागते. तसेच १० टक्के वाढीव कर्ज मिळत असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा, पीक कर्ज नुतनीकरणामुळे खरीप पिकासाठी लागणाऱ्या खर्चास मदत होते. पीक कर्जाचे नूतनीकरण शेतकऱ्यांना फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज नूतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.कागदपत्रांसाठी अधिकार्यांकडून त्रास
काही बॅंकांच्यावतीने शेतकर्यांना अनावश्यक कागदपत्रे मागवण्यात येतात. त्याकरिता शेतकर्यांना बरेच पैसेही खर्च करावे लागते. तसेच काही बॅंकांच्यावतीने विनाकारण पीककर्ज देण्यास विलंब करण्यात येत असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे. जिल्हाधिकार्यांनी अशा बॅंकाच्या अधिकारी, कर्मचार्यावर कारवाइ करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.ही कागदपत्रे आवश्यक
पीक कर्जाच्या नुतनीकरणासाठी प्रत्येक बँक शाखेमध्ये विशेष खिडकी उघडण्यात आली आहे. नुतनीकरणासाठी सात बारा, आठ अ, आधार कार्ड, रेव्हेन्यू स्टॅम्प आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.
खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पिक कर्जाचे अत्यल्प वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज मिळविण्यासाठी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे. - डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी