लसीकरण स्थगित झाल्याने गोंधळ
बुलडाणा : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याला १ मेपासून सुरुवात झाली होती; परंतु आता १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित झाल्याने नोंदणी केलेल्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.
कोरोनामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात घट
बुलडाणा : कोरोनाची धास्ती सर्वसामान्यांपासून ते गुन्हेगारांपर्यंत सर्वांनाच बसली आहे. कोरोनाचा जसजसा संसर्ग वाढत आहे, तसे गुन्हेगारीचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येत आहे. चोरी, खून, विनयभंग आदी गुन्ह्यांचे प्रमाण आता कमी झाले आहे.
घरकूल योजनेचे कामे रेंगाळले
सिंदखेड राजा : तालुक्यातील घरकूल योजनेची अनेक कामे रेंगाळली आहेत. लाभार्थ्यांना वेळेवर हप्ता मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना अनेक समस्यांना सामोर जावे लागत लॉकडाऊनमुळे शिथिलतेनंतरही या कामांना मुहूर्त मिळाला नाही.
बीएसएनएल सेवा विस्कळीत
बुलडाणा : येथील बीएसएनएलची सेवा कुचकामी ठरत आहे. वारंवार लाइनमध्ये खंड पडत असल्याने भ्रमणध्वनी सेवेत सतत व्यत्यय येतो. इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामीण सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था
बुलडाणा : शहरातील झोपडपट्टीलगत सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात न आल्याने हे शौचालय निरुपयोगी ठरत आहेत.
उल्लंघन केल्यास कारवाई
धाड : वैद्यकीय कारणाशिवाय किंवा या मार्गदर्शक तत्त्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी आहे. अधिकृत परवानगीशिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
‘पोक्रा’अंतर्गतच्या योजनांना ब्रेक
बुलडाणा : दरवर्षी पोक्रा अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जाते. याशिवाय हेक्टरी अनुदानही मिळते; परंतु कोरोनामुळे या योजनांनाही ब्रेक लागला आहे.
जि. प. शाळेच्या पटसंख्येत वाढ
मेहकर : खाजगी शाळेची जादा फी आहे; परंतु सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था बिघडली आहे. यामुळे पालकांचा खासगी शाळेतील प्रवेशासाठी ओढा कमी आहे. पर्यायाने जि.प. शाळाकडे जास्त कल आहे.
पाणवठ्यात पाणी सोडण्याची गरज
मेहकर : तालुक्यातील वनक्षेत्र परिसरात अनेक पाणवठे कोरडे पडलेले आहेत. घाटबोरी, द्रुगबोरी या भागामध्ये काही वन्य प्राण्यांसाठी पाणवठे आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्य प्राण्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे अशा पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी सोडणे गरजेचे आहे.
रेमडेसिविरची चढ्या भावाने विक्री
मेहकर : सध्या अनेक रुग्णांना रेमडेसिविरची गरज पडत आहे. त्यामुळे काही मेडिकल चालक रेमडेसिविरची चढ्या भावाने विक्री करीत आहेत. त्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट होत आहे.