- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी व इतर अवजड वाहनांसह ४ लाख ९७ हजार १९८ नोंदणीकृत वाहने आहेत. या वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण तपासणीसाठी केवळ १६ पीयूसी केंद्रे कार्यरत आहेत. यामुळे अनेक वाहने तपासणीविनाच राहात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्याचा वाहतूक विभागाचा नियम आहे. याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे प्रदूषण नियंत्रण तपासणीसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी पीयुसी केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या केंद्रांची संख्या कमी असल्याने वाहनचालकांना वाहनांच्या तपासणीसाठी ‘वेटींग’वर राहावे लागते. परिणामी अनेक वाहनचालक तपासणीकडे दुर्लक्ष करतात. काही वाहनचालक पेट्रोलऐवजी रॉकेलाचाही वापर करतात. याबरोबरच दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील प्रदूषणात भर पडत आहे.वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी न करणाऱ्या वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. याबरोबरच जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या केंद्रांवर भार वाढू नये व जास्तीत जास्त वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी व्हावी, यासाठी पीयुसी केंद्रांची संख्या वाढविण्याला प्राधान्य देणे अपेक्षित आहे.
वाहनचालकांनी आपल्या वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी करणे अनिवार्य आहे. सध्या सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत पीयूसी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण चाचणीविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.- जयश्री दुतोंडे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.