माेताळा शहरात २०१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १६४ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १२४ घरकुल व दुसऱ्या टप्प्यात ४० घरकुल अशा दोन टप्प्यामध्ये एकूण १६४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या घरकुलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने दोन लाख पन्नास हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामध्ये राज्य शासनाकडून एक लाख रुपये तर केंद्र सरकारकडून दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या १२४ घरकुलांपैकी ८२ घरकुल व दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या ४० घरकुलांपैकी ५ अशा ८७ घरकुलांना बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली होती.
दरम्यान, लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा प्रथम हप्ता रक्कम चाळीस हजार देण्यात आला होता तर अधिक ५५ लाभार्थ्यांना राज्य शासनाचा निधी चाळीस हजारांचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे; परंतु कोरोनाकाळात केंद्र शासनाचा निधी उपलब्ध न झाल्याने घरकुल लाभार्थी केंद्र सरकारच्या निधीपासून वंचित राहात आहेत. निधी न मिळाल्याने या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच घरकुल मंजूर झाल्यामुळे या नागरिकांनी पूर्वी असलेली घरे पाडून त्या ठिकाणी घरकुलांचे काम सुरू केले होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यानी आपला संसार उघड्या जागेत तर काहींनी भाड्याच्या खोलीत संसार सुरू केला आहे. नगरपंचायत प्रशासनाने यासंबंधी पाठपुरावा करून लवकर घरकुलांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील घरकुल लाभार्थी करत आहेत.