बुलडाणा : खरीप हंगामाचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे़ कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली असून, जिल्ह्यासाठी १ लाख ६५ हजार मेट्रिक टन खतसाठी मंजूर करण्यात आला आहे़ पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. कुठलीही कमतरता पडू नये, त्याप्रकारे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत दिल्या़
बोगस बियाणे निघाल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाची सरासरी गृहीत धरून आर्थिक मदत देण्यासाठी कंपन्यांकडून लेखी हमीपत्र घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, बोगस बियाणे निघाल्यास कंपन्या तुटपुंजी मदत देतात. यावेळेस कृषी विभागाने बियाणे कंपन्यांकडून लेखी हमी घ्यावी, जर बोगस बियाणे निघाले व शेतकऱ्याचे नुकसान झाले तर, वार्षिक उत्पन्नाचे सरासरी गृहीत धरून कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी. गुणनियंत्रणासंदर्भात विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करावी. या पथकांकडून खते, बियाणे व कीटकनाशक दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ३० मे पर्यंत ५० टक्के व १५ जूनपर्यंत ८० टक्के कृषी पतपुरवठा पूर्ण करण्यात यावा. बँकांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्ज वितरण पूर्ण करावे. त्यासाठी सातत्याने आढावा घ्यावा, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, खते, बियाणे, कीटकनाशके याबाबत प्राप्त शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत गावांची संख्या वाढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावे. या वर्षातील पीक विमा मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. मका खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू करण्याकरिता प्रस्ताव पाठवावा. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची जनजागृती करून जास्तीत जास्त अर्ज प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले़ याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, आदी उपस्थित होते. एनआयसी केंद्रात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे उपस्थित होत्या. तसेच विभागप्रमुख, अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
खरिपाचे ७़ ३५ हजार हेक्टवर नियाेजन
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७ लाख ३५ हजार ४०० हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे़ यामध्ये सोयाबीन पीक ३ लक्ष ८५ हजार हेक्टर, कापूस १ लक्ष ९८ हजार हेक्टर, तूर ७४ हजार हेक्टर, उडीद २० हजार हेक्टर, मका २८ हजार, ज्वारी १० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.
पीक कर्जदर निश्चित (एकरी)
संकरित ज्वारी ११ हजार ५०० रुपये, संकरित बाजरी १० हजार रु. मका १३ हजार ३०० रु. तूर १९ हजार ५०० रुपये, उडीद व मूग १० हजार, सूर्यफूल १२ हजार, कापूस बागायती २३ हजार ८००, कापूस जिरायत २० हजार ४००, सोयाबीन २० हजार रुपये, असे निश्चित करण्यात आले आहेत़