तलवारबाजी संघ निवडीचे बुलडाण्यात स्वागत
बुलडाणा : पुणे येथे महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत तलवारबाजी राज्याध्यक्षपदी सतेज पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीचे बुलडाण्यात जिल्हा संघाकडून स्वागत करण्यात आले आहे.
लोणार परिसरातील जलपातळीत घट
लोणार : वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे. सरोवरातील पाण्याने कमी पातळी गाठली आहे. सरोवराला येऊन मिळणारे पाचपैकी दोन प्रमुख नैसर्गिक झरे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
विहिरीत धरणातून पाणी पुरवठा
दुसरबीड : गावालगत एक ग्रामपंचायतीची शासकीय विहीर आहे. त्या विहिरीत मांडवा धरणातून पाणीपुरवठा होतो. विहिरीत अतिरिक्त पाणीसाठा होत असल्याने ते पाणी इतर गावांना टँकरने पुरविल्या जाते. दुसरबीड येथील ग्रामस्थांना सुध्दा टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
वाढत्या तापमानाचा पक्ष्यांवर परिणाम
बिबी : वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मानवाबरोबरच पक्ष्यांनाही याचा फटका बसत आहे. पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत आहे. वेळीच पाणी न मिळाल्याने व उष्माघातामुळे अनेक पक्षी मृत्युमुखी पडण्याचा धोका वाढतो. यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागल्याने पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
उन्हाळी शिबिराला कोरोनाचा फटका
बुलडाणा : एप्रिल किंवा मे मध्ये १० ते १५ दिवसांचे मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये झुंबा डान्स, संगीत, कला, खेळ तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा उन्हाळी शिबिराला कोरोनाचा फटका बसला आहे.
पुलावरून जड वाहतूक
किनगावराजा : काही ठिकाणच्या पुलावरून २०-२० मेट्रिक टनांपर्यंतची जड वाहतूक बंद केलेली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असून अनेक ठिकाणी अशी जड वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
तलावाचे सौंदर्य दडले झाडाआड
बुलडाणा : येथील इंग्रजकालीन तलावाचे सौंदर्य झाडाझुडपाआड दडल्याचे दिसून येते. तलाव काठावर बेशरमीचेही प्रमाण वाढले आहे. शहरात अनेक ऐतिहासिक तलाव आहेत. परंतु त्या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे तलाव परिसरात दुर्गंध येते.
शाळा बंद, स्कूल बस तपासणीकडे दुर्लक्ष
बुलडाणा : स्कलबसची तपासणी न केल्यास आरटीओकडून परवाना निलंबित करण्यात येतो. बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या स्कूल बसची आरटीओकडून होणाऱ्या फेरतपासणीकडे स्कूल बसच्या चालकांनी दुर्लक्ष केले आहे. वर्षभरापासून शाळा बंद असल्याने स्कूल बसची तपासणीही करण्यात येत नाही.
सुलतानपूर परिसरात गुटखा विक्री
सुलतानपूर : परिसरात गुटख्याची अवैध विक्री वाढली असून याकडे पोलीस, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याऱ्यांचे फावले आहे. सुलतानपूर हे राज्य महामार्गावरील गाव आहे. गावात गुटख्याची अवैध विक्री वाढली आहे.
सिमेंट दरवाढीचा बांधकाम व्यवसायाला फटका
बुलडाणा : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रति बॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, बांधकाम व्यावसायिक तथा मजूर वर्गावरही विपरीत परिणाम होत आहे.