खामगाव: स्थानिक कृउबासच्या गुरांच्या बाजारात १८ म्हशीची खरेदी केल्यानंतर १५ लक्ष रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. दरम्यान फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच कंझारा येथील व्यापार्यांनी दोघांविरोधात शहर पोलीसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी नांदेड जिल्ह्यातील दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत खामगाव तालुक्यातील कंझारा येथील शफीउल्ला खान हाफीज उल्ला खान ४८ यांनी शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, कपिल प्रकाश जाधव, वैभव प्रकाश जाधव दोघेही रा. किवडा ता. लोहा जि. नांदेड यांना १५ नोव्हेंबर २०२२ ते ४ सप्टेंबर २३ पर्यंत १८ म्हशी १६ लाख ६८ हजार ८०० रुपयांना विकल्या. या म्हशीच्या व्यवहारापोटी शफीउल्ला खान एक लाख रूपये रोख देण्यात आले. तसेच १६ मार्च २०२३ रोजी ९५ हजारांच्या दोन म्हशी आणि पाच हजार रूपये रोख असे एकुण दोन लाख ०५ हजार रुपये देण्यात आले. मात्र, उर्वरीत १४ लाख ६८ हजार रुपये देण्यास वारंवार टाळाटाळ करण्यात आली. पैसे मागीतले असता जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी मंगळवारी उपरोक्त दोघांविरोधात भादंवि कलम ४०६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.