लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: कोरोना संसर्गची व्याप्ती जिल्ह्यात अलिकडील काळात कमी होत असल्याचे चित्र असून गेल्या सात महिन्यात नऊ प्रशासकीय विभागातील तब्बल १७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आनंदाची बाबा म्हणजे यापैकी १५१ जणांनी कोरोनावर मात करून पुर्ववत आपला पदभार सांभाळला असल्याचे चित्र आहे.मात्र गेल्या दहा दिवसात पोलिस विभागातील चार अधिकाऱ्यांसह एकूण २० अधिकारी कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहे. तेही लवकरच कोरोनामुक्त होवून आपला पदभार पुन्हा स्वीकारतील असा सकारात्मक आशावाद प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.कोरोना बाधीत आढळून आलेल्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, पोलिस विभाग, महसूल विभाग, पालिका, वैद्यकीय, मृद व जलसंधारण, कृषी विभाग, गृहरक्षक दल आणि एसटी महामंळ या नऊ प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.एकंदरीत विचार करता उपरोक्त नऊ प्रशासकीय विभागातील ७,४२४ अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी २.३० टक्के अर्थात १७१ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. वेळोवेळी आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीमध्ये या व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्याने त्यांना त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या पैकी १५१ बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही २० जणांवर उपचार सुरू आहेत.
पोलिस विभागाला सर्वाधिक बाधा
गेल्या सात महिन्यात प्रामुख्याने पोलिस विभाग कोरोना संगर्गाने अधिक ग्रासल्या गेल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस विभागातील दहा अधिकारी आणि ७८ कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले होते. हा आकडा ८८ च्या आसपास आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसातच पोलिस विभागातील चार अधिकारी सात कर्मचारी असे एकूण ११ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. पोलिस विभागातील एका कर्मचाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असला तरी अैारंगाबाद येथे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याची नोंद अद्याप जिल्ह्यात झालेली नाही.
पालिकांमधीलही कर्मचारी बाधीतजिल्हयातील ११ पालिका व दोन नगरपंचायती मिळून आतापर्यंत २४ कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहेत. हे सर्व कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून पुर्ववत कामावर हजर झाले आहेत. वर्तमान स्थितीत राज्य परीवहन महामंडळातील आठ, क्षय आरोग्य धाममधील एक आणि पोलिस विभागातील ११ असे २० जण बाधीत असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.