बुलडाणा/हिवरा आश्रम : नुसते साप म्हंटले की काळजात धस्स! होते. पण एकाच वेळी एकाच ठिकाणी तब्बल १८ साप आणि तेही नाग आढळून आल्याची दुर्मिळ घटना मेहकर शहरा लगतच्या एका फार्महाऊसवर घडली. दरम्यान, मेहकर येथील सर्पसखी वनिता बोराडे यांनी हे सर्व १८ ही नाग पकडून त्यांना जंगलात सुरक्षीत स्थळी सोडून दिले. बुधवार ११ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. मेहकर बायपासवर प्रशांत सावजी यांच्या मालकीचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये एकाच ठिकाणी स्थानिकांना तब्बल १८ साप दिसले. त्यामुळे खळबळ उडाली होती. परिणामी जवळपास ५१ हजारापेक्षा अधिक साप पकडण्याचा अनुभव असलेल्या मेहकर येथील वनिता बोराडे यांना तेथे पाचारण करण्यात आले होते. त्यांनी आपले कसब वापरून हे १८ नाग पकडले. हे सर्व साप सहा ते सात फुट लांबीचे होते. त्यामुळे या विषयी मेहकर परिसरात सध्या नागरिकांमध्ये कुतूहल आहे. विशेष म्हणजे या एकाच दिवशी १८ नागांसह मेहकर परिसरातील विविध भागात त्यांनी एकूण ३८ साप पकडले आणि ते जंगलात सोडून दिले. दरम्यान, हे साप जंगलात सोडले जरी असले तरी एकाच ठिकाणी ऐवढे साप कसे असा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्यामुळे त्याचा मागोवा घेतला असता बुलडाणा जिल्ह्यात भालेगाव, साखरखेर्डा आणि बुलडाणा शहरातही एकाच वेळी मोठ्या संख्येने असे साप यापूर्वी आढळून आले होते. बुलडाण्यातील जेष्ठ सर्पतज्ज्ञ तथा अभ्यासक ई. एच. पठाण यांनीही अशाच काही सापांना पकडून यापूर्वी जंगलात सोडून दिलेले आहे. बुलडाणा शहरात तर एका पोलिस कर्मचार्याच्या घरात पाच मन्यार जातीचे साप पकडले होते. त्यातील एक मादी होती. मन्यार हा साप साधारणत: रात्रीच बाहेर पडतो आणि तो अत्यंत विषारी आहे. आपल्या भागात ५२ प्रकारचे साप आढळतात. त्यातील घोणस, मण्यार, कोब्रा, फुरसे हे प्रामुख्याने विषारी साप असून पोहळा हा पाचवा विषारी साप आहे.
सापांचा मेटींग पिरिएड सप्टेंबर-आॅक्टोबर
मेहकर येथील फार्महाऊसमध्ये हे १८ नाग पकडण्यात आल्यानंतर ते मेटींग साठी आले होते अशी चर्चा सध्या आहे. मात्र सापांचा मेटींग पिरिएड हा सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्या दरम्यान असतो. मात्र प्रसंगी मादी सापाचा डाऐट, वातावरण आणि तापमान यामुळे हा काळ कमी अधिक होऊ शकतो. अशा स्थितीत मादी साप हा दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात फिरून गुदद्वरातून फोरामन्स (रस) बाहेर टाकत असते. हे स्वजातीच्या सापांना आमंत्रण असते. स्वजातीच्या साप त्या भागात असल्यास किंवा मादी सापा गेलेली रेषा ओंलाडत असल्यास त्याच्या जीभेद्वारे तोंडात असलेल्या जेकअप सम आॅर्गनवर सापाने जीभ चिटकवल्यास त्याला याचा अंदाज येतो आणि साप मादीला शोधून काठतो. अशाच पद्धतीने या ठिकाणी हे साप एकत्र आले असतील, असा कयास पठाण यांनी व्यक्त केला. दरम्यान, या भागात पाणी उपलब्ध असले, पकडकी जागा, वाडा असल्यासही त्या ठिकाणी हे साप आढळून आले असतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
उन्हाळा निद्रा काळ
उन्हाळा हा सापांचा निद्रा काळ असतो. त्यामुळे थंड ठिकाणी किंवा पाला पाचोळ््याखाली साप निद्रावस्थेत गेलेला असतो. अशा स्थितीत शेतकर्यांनी अनोळखी ठिकाणी किंवा शेतात काडीकचरा, गवत वेचतांना, गुरांना चारा टाकताना काळजी घ्यावी. अडचणीच्या ठिकाणी शक्यतो हात घालणे टाळावे, असे आवाहनही शेतकर्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून जेष्ठ सर्पतज्ज्ञ ई. एच. पठाण यांनी केले आहे. उन्हाळ््यात बर्याचदा शेतात काडीकचरा जाळल्या जातो. अशा स्थितीत तेथे साप असल्यास तो अन्यत्र धाव घेतो.