अनिल गवई
खामगाव: कोरोना विषाणूला हरविण्यासाठी नांदुरा नगर पालिकेने भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी सुरू केली आहे. या पॅटर्नच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने १८० जणांची नियुक्ती केली असून, बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा नगर पालिका ही भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी करणारी पहिली पालिका ठरतेय. जगभर हाहाकार माजविणाºया कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदुरा नगर पालिकेने सुरूवातीपासूनच अंमलबजावणी सुरू केली. भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी एक आराखडा विकसीत केला. यासाठी शिक्षक आणि कर विभागातील १८० जणांची नियुक्ती करण्यात आली.
वार्डनिहाय तिघांची नियुक्ती!
नांदुरा शहरात २१ वार्ड आहेत. या वार्डांसाठी प्रत्येकी तीन जणांना जबाबदारी देण्यात आली आहे. यातील ४० जण घरावर नंबर आणि कुटुंब प्रमुखांच्या नावांची नोंद घेत, पुढील कारवाई केली जाणार आहे.
शिक्षकांना प्रत्येक वार्डाचे पालकत्व!
नगर पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना वार्डनिहाय पालकत्व देण्यात आले आहे. कर विभागातील कर्मचाºयांशी समन्वय करून या शिक्षकांना आपल्या वार्डात शंभरटक्के सर्वेक्षण पूर्ण करावयाचे आहे. या शिक्षक आणि कर विभागातील कर्मचाºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकही नियुक्त केले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नांदुरा नगर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भिलवाडाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या कृतीशील अंमलबजावणीसाठी १६३ जणांची नियुक्ती केली आहे. कोरोनाचा एकजुटीने सामना करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
-नीरज नाफडे,
आरोग्य तथा पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, नांदुरा