लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील १८०० खासगी डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे आंदोलन ७ सप्टेंबरपासून करण्यात आले आहे. २४ तासाचा कालावधी उलटला तरी अद्याप शासनाकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.बुलडाणा, खामगाव, लोणार, मलकापूर, शेगाव, नांदुरा आदी ठिकाणी खासगी डॉक्टरांनी कळकळीत बंद पाडला. त्यामुळे डॉक्टरांच्या बंदचा रुग्णांना चांगलाच फटका बसला. ७ व ८ सप्टेंबरला सर्व खासगी हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या दिवशी दिवसभर कडकडीत बंद डॉक्टरांनी पाळला. ५ सप्टेंबरला बुलडाणा शहरातील डॉ. मेहेर यांच्यावर एका आरोपीने रुग्ण तपासत असताना प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात डॉक्टरांच्या उजव्या डोळ्याला व चेह-याला गंभीर दुखापत झाली असून, फ्रॅक्चरसुद्धा झाले आहे. त्यामुळे या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागत आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे याचा निषेध म्हणून बुलडाणा मेडिकल असोसिएशनने ७ व ८ सप्टेंबरला सर्व खासगी हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या साथीच्या रोगांचा फैलाव होत असल्यामुळे रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे रूग्णांची दवाखान्यात गर्दी होत असताना दवाखाने बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील रूग्ण व त्यांचे नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने २ दिवस पुकारलेल्या या संपामुळे जिल्ह्यात रूग्णसेवा कोलमडली आहे.(प्रतिनिधी)
बुलडाणा जिल्हयातील १८०० खासगी डॉक्टरांचा आजही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 1:01 PM
खामगाव : डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील १८०० खासगी डॉक्टरांनी बंद पुकारला आहे.
ठळक मुद्देबुलडाणा, खामगाव, लोणार, मलकापूर, शेगाव, नांदुरा आदी ठिकाणी खासगी डॉक्टरांनी कळकळीत बंद पाडला. २ दिवस पुकारलेल्या या संपामुळे जिल्ह्यात रूग्णसेवा कोलमडली आहे.