- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांच्या काळात जिल्ह्यातील १८ हजार ४२९ कुटुंबांना रोजगार हमी योजनेवरील कामांनी तारले. या कुटुंबातील जवळपास २७ हजार ५० व्यक्तींना रोजगार हमी योजनेवर गावपातळीवरच काम मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.कठोर निर्बंधांच्या काळातील ग्रामीण जीवन व रोजगाराची स्थिती यासंदर्भात माहिती घेतली असता ही बाब समोर आली. बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने कहर केला होता. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रकोप दिसून येत होता. त्यामुळे राज्य शासनाच्या आधीच १५ दिवस जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले होते. त्यामुळे शहरी भागातून आधीच आपल्या गावाकडे आलेल्या व्यक्तींच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच या कालावधीत रोजगार हमी योजनेवरील कामांमध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा आधार ग्रामीण भागात हातावर पोट असणाऱ्या मजुरांना मिळाला. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात रोजगार हमी योजनेवर महत्तमस्तरावर मजुरांची संख्या वाढली होती. विशेष म्हणजे यात सर्व अकुशल कामगारांचा समावेश होता. त्यातच अलिकडील काळात रोहयोच्या मजुरीतही काही प्रमाणात वाढ करण्यात आली होती. त्याचाही फायदा या मजुरांना झाला. दरम्यान जून महिन्याच्या प्रारंभी निर्बंध जसजसे शिथील होऊ लागले आणि पावसाचे आगमन झाले तस तशी रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही रोडावली.
कठोर निर्बंधांच्या काळात १८, ४२९ कुटुंबांना मिळाला रोहयोचा ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 11:11 AM