बुलडाणा : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने गुरूवारी अर्थात दहा मे रोजी जिल्ह् यात ४७ पथकाद्वारे धडक कारवाई करून १९ लाख २८ हजार रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यामध्ये बुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे एकूण २३० जणांवर कारवाई करण्यात आली. आकस्मिकपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वीज चोरट्यांचे धाबे दणांणले आहे. वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणने गेल्या काही काळात पायाभूत सुविधांवर भर देत दर्जा सुधारला आहे. त्यामुळे वीज चोरी व वीजेचा अवैध वापर करणार्यांचीही माहिती समोर आली आहे. त्यानुषंगाने ही धडक कारवाई करण्यात आली. प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता जी. एम. कडाळे यांच्या नेतृत्वाखाली एकूण ४८ पथकांद्वारे कार्यकारी अभियंते काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये व पांडुरंग पवार यांच्यासह जिल्ह्यातील अभियंते, अधिकारी व जनमित्र यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला. या पथकांनी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विविध वर्गवारीच्या ग्राहकांची तपासणी केली. त्या दरम्यान हे सर्व प्रकार उघड झाले.
खामगाव विभागात सर्वाधिक चोऱ्या
या कारवाईदरम्यान विद्युत वाहिन्यावर आकोडे, हुक टाकून तथा वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. सोबतच वीजेचा गैरवापरही काही ग्राहक करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये बुलडाणा विभागात ५१ ग्राहकांनी दोन लाख ५१ हजार तर खामगाव विभागातील १२५ ग्राहकांनी १४ लाख ६२ हजार आणि मलकापूर विभागातील ५४ ग्राहकांनी २ लाख १६ हजार रुपयाची वीज चोरी केल्याचे कारवाई दरम्यान स्पष्ट झाले. या सर्वांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामूहिकरीत्या सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी केले आहे.