लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत असला तरी १९ टक्के विद्यार्थी त्यापासून अजुनही दूर असल्याचे चित्र आहे. तसेच साधनांचा अभाव असलेल्या ११ हजार ११९ विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांचा आधार असल्याचे चित्र आहे.दरवर्षी १ जुलैला वाजणारी शाळेची घंटा यावर्षी कोरोनामुळे वाजलीच नाही. जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मार्च महिन्यांपासून लॉकडाउन करण्यात आले होते.कोरोनामुळे, शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी शासनाकडून अनलॉकची प्रक्रीया सुरू करण्यात आली असली तरी शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार याविषयी अजुनही निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होउ नये यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी होत असला तरी ग्रामीण भागात तो अपयशी ठरल्याचे चित्र आहे. विशेषत: जिल्हा परिषदांच्या शाळेत शिक्षणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. तसेच स्मार्ट फोन असला कव्हरेज व रिचार्ज करण्यासाठी पैसा नसल्याने अनेक विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणापासून दूरच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पहिली ते १२वी चे एकूण पाच लाख १८ हजार ६५३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ३२ टक्के विद्यार्थ्यांना म्हणजेच १ लाख ६७ हजार ४१३ विद्यार्थी दूरदर्शन/केबलद्वारे शिक्षणाचे धडे घेत आहेत .तसेच १ लाख ८७ हजार ४६३ विद्यार्थी स्मार्ट फोनच्या द्वारे आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे दूरदर्शन, केबल आणि स्मार्ट फोन ही साधने नाहीत,अशा ११ हजार ११९ विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांच्या माध्यमातून शिक्षणाचे घ्यावे लागत आहेत. तसेच इतर माध्यमांद्वारे ५४ हजार ०९९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये स्वयंअध्ययन, रेडीओ या साधनांचा समावेश आहे. सर्व माध्यमातून एकूण ४ लाख २० हजार ९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.