किशोर मापारी लोणार सरोवराला त्रिवेणी संगम असे म्हटल्या जाते. या ठिकाणाला वैज्ञानिक, ऐतिहासिक व पौराणिक असे संदर्भ आहेत. याच त्रिवेणी संगमामध्ये असलेली पौराणिक कथेमध्ये असलेल्या सासू- सुनेच्या विहिरीचे तब्बल शुक्रवारी १९ वर्षांनी दर्शन घडले. यावर्षीच्या कडक उन्हामुळे सरोवराच्या पाण्यामध्ये कमालीची घट झाल्याने ही विहीर निदर्शनास पडत आहे. लोणार सरोवर हे जागतिक कीर्तीचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी त्रिवेणी संगम पाहावयास मिळतो. उल्का पडल्यामुळे लोणार हे सरोवर तयार झाले, या घटनेला वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्या जाते, तर लोणार नगराचा पहिला संदर्भ ऋग्वेदामध्ये आला असल्यामुळे आणि या ठिकाणी विष्णूचे मुख्य १० अवतार असल्यामुळे या शहराला पौराणिक असा संदर्भ मिळतो, तर ऐतिहासिक म्हणून सम्राट अशोकाच्या साम्राज्यात लोणार असल्याचे अनेक ठिकाणी नोंद आहे. यासाठीच लोणार सरोवरास त्रिवेणी संगम म्हणून ओळखल्या जाते. अशा त्रिवेणी संगमापैकी एक संगम म्हणजे पौराणिक कथेनुसार पुराणमध्ये लोणार सरोवरामध्ये कमळजा देवीचे मंदिर आहे, पौराणिक कथेनुसार अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्राने राम वनवासात आले असता येथे सीतेची ओटी देवीने भरली होती, तसेच येथे तपश्चर्या केली होती, त्यामुळे ही भक्तांना पावन होणारी देवी आहे. याच ठिकाणी मोठमोठ्या संत व ऋषींनी तपश्चर्या केल्याचे दाखले आहेत. त्यांना देवीने दर्शन दिले. मराठवाडा, खान्देश, विदर्भामधील बऱ्याच कुळाची ही कुलदेवता आहे. मंदिरासमोरे एक विहीर आहे तिला योनी कुंड (सौभाग्य तीर्थ) असेसुद्धा संबोधल्या जाते. त्या कुंडास सासू- सुनेची विहीरसुद्धा म्हटल्या जाते. सासू- सुनेची विहीर म्हणजेच एकाच विहिरीतील पाण्याची चव ही वेगवेगळी असून, देवीच्या मंदिराकडील बाजूच्या पाण्याची चव ही गोड असल्यामुळे तिला सुनेची विहीर, तर सरोवराकडील विहिरीतील पाण्याची चव ही खारट असल्यामुळे तिला सासूची विहीर असेसुद्धा बोलल्या जाते. अशी ही आगळी- वेगळी विहीर मागील १९ वर्षांपूर्वी दिसली होती.तेव्हापासून ती सरोवराच्या पाण्यामध्ये बुडाली होती. मात्र गत चार वर्षांपासून सरोवरातील पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची घट होत आहे. वाढत्या तापमानामुळे व अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी किमान १०० फूट कमी झाली. ही विहीर १९९८ मध्ये दृष्टीस पडली होती. तेव्हा सरोवराच्या पाण्याची पातळी अचानकपणे वाढल्यामुळे ही विहीर परत पाण्यात लुप्त झाली. गेल्या चार वर्षांपासून कमी होत चाललेल्या पाण्याच्या पातळीमुळे ही ह्यसासू-सुनेची विहीरह्ण गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे पाण्याच्या पातळीच्या वर आलेली आढळली. त्यामुळे सरोवरातील ऐतिहासिक पौराणिक काळामध्ये नोंद असलेल्या सासू-सुनेच्या या विहिरीचे दर्शन होत आहे.
१९ वर्षांनंतर ‘सासू-सुनेच्या विहिरीचे’ दर्शन
By admin | Published: May 13, 2017 4:45 AM