चिखली : दि. चिखली अर्बन को-ऑप. बँकेच्या वतीने प्रत्येक बचत खातेदाराचा अपघात विमा काढला जातो. खात्यात एक हजार रुपये शिल्लक असलेले खातेदार अपघात विम्यासाठी पात्र ठरतात. या योजनेचा गोदरी येथील मृतक संदीप रामभाऊ जाधव यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, बँकेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मृतक खातेदाराच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली आहे.
संदीप जाधव यांचे १२ ऑक्टोबर २०२० रोजी एका अपघातात निधन झाले आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत दि. चिखली अर्बन बँकेची अपघात विमा योजना त्यांच्यासाठी मोठा आधार ठरली आहे. बँकेने मृत्यूसंबंधीच्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून विमा कंपनीकडे पाठपुरावा करून अपघात विमा मंजूर करून घेतला आहे. याअंतर्गत वारसदार आशा राऊत यांना २ लाख अपघात विमा, १० हजार मुलाच्या शिक्षणासाठी व ४ हजार अत्यंसंस्कारासाठी असा एकूण २ लाख १४ हजारांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, स्थानिक शाखा सल्लागार प्रकाश हरगुणांनी, विजय सिसोदिया, अर्चना खबुतरे, अलका पुरनकर, बँकेचे सरव्यवस्थापक संजय भंगिरे, शाखा अधिकारी जोशी यांची उपस्थिती होती.