बुलढाणा : स्वत:च्या अल्पवयीन मुलीला पाय दाबण्याच्या बहाण्याने जवळ बोलावत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पित्यास बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील ६ साक्षीदार फितूर झाल्यानंतरही जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांचा प्रभावी युक्तिवाद, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस ३० डिसेंबर रोजी ही शिक्षा सुनावली.
बुलढाणा तालुक्यातील एका गावात सप्टेंबर २०२२ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईनेच नंतर पोलिसात तक्रार दिली. सप्टेंबर २०२२ मध्ये पीडित मुलगी ही घरी असताना पाय दाबून देण्याच्या बहाण्याने तिला जवळ बोलावत जबरी संभोग केला होता. या प्रकाराची वाच्यता केल्यास पीडितेला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता पाहता घटनास्थळाचा पंचनामा व विविध जप्ती पंचनामे केले. तपासाच्या अनुषंगाने पीडितेची व आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडेही जप्त केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करीत तपासी अधिकारी गजानन बस्टेवाड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एकूण १५ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. यामध्ये जप्ती पंच, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी व घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, ग्रामविकास अधिकाऱ्याची साक्ष यासंदर्भाने जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सोबतच आरोपीस अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यासह अन्य कलमांन्वये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात वादी - प्रतिवादी पक्षांचा युक्तिवाद ऐकत जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपीस पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अधिकची शिक्षा यासह अन्य कलमांन्वये शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा आरोपीस एकाच वेळी भोगावयाच्या आहेत
पीडितेला अर्थसहाय्य देण्यासाठी निकाल विधीसेवा प्राधिकरणाकडे-
या प्रकरणातील पीडितेला आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी सदरचा निकाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबूसिंग बारवाल यांनी काम पाहिले. प्रकरणात १५ पैकी सहा साक्षीदार फितूर झाले होते. मात्र वादी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. प्रकरणातील तक्रारकर्त्या पीडितेची आई फितूर झाल्याने न्यायालयाने सीआरपीसीच्या कलम ३४४ नुसार कार्यवाही केली आहे. सोबतच तिला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.