बुलडाणा : गत काही दिवसांपासून तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती हाेत आहे. वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी बुलडाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या पाडळी, गुम्मी, उंद्री व बुलडाणा या वनवर्तुळाच्या वनक्षेत्रात जिल्हा वार्षिक नियोजन निधीअंतर्गत १० सिमेंटी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. एका पाणवठ्यासाठी ३५ ते ४० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे, तसेच पूर्वीच्या ११ पाणवठ्यांचे नव्याने अस्तरीकरण करण्यात आले आहे.
बुलडाणा वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचे वास्तव्य असून बिबट, अस्वल, तडस, हरिण, रोही, भेडकी, चितळ, काळवीट, रानडुक्कर, लांडोर, ससे, मोर, सायळ व इतर पशू-पक्ष्यांचे वास्तव्य आढळून आले आहे. या वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये, याकरिता वनपरिक्षेत्राच्या जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यासाठी बुलडाणा डीएफओ अक्षय गजभिये, एसीएफ रणजित गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांनी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीअंतर्गत सिमेंटचे १० पाणवठे योग्यरीत्या व आवश्यक असलेल्या ठिकाणी तयार करून घेतले आहेत. त्यात गिरडा-१, पाडळी-१, पळसखेड-२ अशा प्रकारे पाडळी वर्तुळात ४, तर गुम्मी-१, खोर-१, गुम्मी वर्तुळात २ आणि बिरसिंगपूर ( घाट दरवाजा ) १, भादोला-१, असे बुलडाणा वर्तुळात २, तसेच हरणी-१ व किन्ही नाईक येथे १, असे उंद्री वर्तुळात २, असे सिमेंटचे एकूण १० कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. इतर विविध ठिकाणी असलेल्या ११ पाणवठ्यांचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. प्लास्टिक शीट टाकून हे ११ पाणवठे निर्माण केले गेले. बुलडाणा वनपरिक्षेत्रातील या पाणवठ्यांची नियमित देखरेख व स्वच्छता होत आहे. वन कर्मचाऱ्यांची नियमित गस्त असल्याने जंगलात शिरण्याचे कुणीही धाडस करीत नाही. त्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येत असल्याची माहिती बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांनी दिली.