- अझहर अली लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागाच्या वेळ काढू धोरणामुळे जिल्हयात शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.गेल्या कित्येक वषार्पासून येथील उर्दू शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचा कारभार प्रभारावरच सुरू आहे. शिक्षण विभागाने येथील शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रशासन स्तरावरून कधीच प्रयत्न करण्यात आले नाही. उलट या तालुक्याला सावत्रपणाची वागणूक देत येथील प्रश्न वाढविण्यावर भर देण्यात आला असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. शिक्षण विभागाकडून नुकतेच या तालुक्यावर अन्यायकारक निर्णय घेऊन येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आखण्यात आला असल्याचे उघडीस आले आहे. काही दिवस अगोदर जिल्हा परिषदने २६ नवीन शिक्षकांची भरती केली. या भरती मधूनही संग्रामपूर पंचायत समितीला इतर तालुक्यातील पंचायत समितीच्या तुलनेत दुजाभाव देण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाची लहर दिसून येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने येथील रिक्त असलेल्या पदांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत नावाला केवळ एका शिक्षकाची नियुक्ती करीत वेळ मारून नेल्याने शिक्षणाचे तीन तेरा वाजवले. संग्रामपुर तालुका हा आदिवासीबहुल तालुका असल्याने जिल्हा मुख्यालयाकडून या तालुक्याला नेहमी सावत्रपणाची वागणूक दिली जाते. ही परंपरा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही कायम ठेवली आहे. तालुक्यातील ८ गावांमधील ९ शाळेवर तब्बल २१ शिक्षकांची पदे रिक्त असल्यावर सुद्धा शिक्षण विभागाने केवळ एका शिक्षक सेवकाची नियुक्ती करून वेळ मारून नेली. २१ शिक्षकांची पदे रिक्त असतानादेखील सोनाळा येथे एक शिक्षक देऊन प्रशासन मोकळे झाले. शिक्षण विभागाच्या कामचुकारपणामुळे संग्रामपूर तालुक्यातील उर्दु शाळेवरील शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद कडून नुकतेच २६ शिक्षकांची भरती करण्यात आली. यातून जळगाव जा. पंचायत समिती अंतर्गत जामोद ३ येथे तर सूनगाव येथे १ शिक्षक देण्यात आला. मेहकर पंचायत समितीअंतर्गत डोणगाव येथे १ शिक्षक, नांदुरा पंचायत समिती अंतर्गत अंभोडा येथील शाळेवर १ शिक्षक, बुलढाणा पंचायत समिती अंतर्गत रायपुर शाळेवर १ शिक्षक, खामगाव पंचायत समितीला ६ शिक्षक प्राप्त झाले असून घारोड, आवार, लाखनवाडा, पिंपळगाव राजा, भालेगाव, बोरी आडगाव या गावातील शाळेवर प्रत्येकी १ शिक्षक देण्यात आला. मोताळा पंचायत समिती अंतर्गत माकोडी येथे ३ तर मोताळा येथील शाळेवर ३ शिक्षक देण्यात आली. देऊळगाव राजा पंचायत समिती अंतर्गत देऊळगाव मही येथे १ शिक्षक देण्यात आला. चिखली पंचायत समितीला ३ शिक्षक प्राप्त झाले असून मोहदरी, मेरा खुर्द, किन्होळा याठिकाणी प्रत्येकी 1 शिक्षक देण्यात आला. सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत गोरेगाव येथील शाळेवर १ तर शेगाव पंचायत समिती अंतर्गत अडसना येथील शाळेवर १ शिक्षक देण्यात आला आहे.