अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मागील आठवड्यात सेवानगर येथील ८७ जणांची देऊळगावराजा येथे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २२ जण पाॅझिटिव्ह आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा मांटे, अंढेराच्या सरपंच रूपाली आंबिलकर, मंडळ अधिकारी भगवान पवार, तलाठी चव्हाण यांनी या क्षेत्राची पाहणी करत तत्काळ सेवानगर येथील जि. प. शाळेत पुरुष व महिलांसाठी दोन वेगवेगळे आयसोलेशन वाॅर्ड तयार करण्यात आले. या रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा अंतर्गत दररोज तपासणी करण्यात येणार आहे.
संपूर्ण सेवानगरला तत्काळ फवारणी करण्यात येईल, नागरिकांनीसुध्दा विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्यथा ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने नागरिकांना दंड आकारण्यात येईल, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अंढेरा सरपंच रूपाली आंबिलकर यांनी केले आहे. सेवानगर येथील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता सर्व रुग्णांची तत्काळ आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने वेगळी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, तसेच आरोग्य विभागाने गावातील लोकांची दररोज जास्तीत जास्त संख्येने तपासणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सरचिटणीस विनोद चव्हाण यांनी केले.
अंढेरा येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद!
अंढेरा येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद झाल्याने लसीकरण सुरू करण्याची मागणी होत आहे. लसीकरणाची संमतीनंतरसुद्धा नागरिकांची परवड होत आहे. स्वत: नोंदणी झालेल्यांना लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा येथे कोविशिल्ड लस घेण्यासाठी गेले असता ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना लस उपलब्ध नसल्याने अनेकांना अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोविशिल्ड लस देण्यात आली नसल्याने माघारी परतावे लागत आहे. तसेच अनेक जण दुसऱ्या लसीकरणासाठी दवाखान्यातून माघारी परतत आहेत.