लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शासनाच्या योजनांची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गांभीर्य दाखवत नसल्याने या संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. विविध मागण्यांबाबत वेळोवेळी झालेल्या चर्चा, बैठकात देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील 22 हजार ग्रामसेवक शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.याबाबत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना युनियनच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी म्हटले आहे की, राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. शासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनुसार प्रत्यक्षात कार्यवाही करण्याचे आदेश जारी करण्यात यावेत. ग्रामसेवक संवर्गास दरमहा 3 हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करण्यात यावा, ग्रामसेवकांची शैक्षणिक अर्हता बदल करण्यात येवून यापुढे कोणत्याही शाखा पदवीधर ग्रामसेवक भरतीत समाविष्ट करावा, सन 2011 च्या लोकसंख्येचा आधार घेवून राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढवावीत, ग्रामसेवक पद रद्द करून यापुढे फक्त ग्रामविकास अधिकारी अथवा पंचायत विकास अधिकारी या पदाची निर्मिती करावी, ग्रामसेवकांवरील कामांचा ताण लक्षात घेवून अतिरिक्त कामाचा बोजा लादू नये, महसूल, वन, कृषी, नरेगा आदी विभागांची कामे करताना सक्ती, कारवाई केली जाते. हे प्रकार तातडीने थांबविण्यात यावेत. ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू करताना अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. या वेतनत्रुटीत तातडीने सुधारणा करावी, राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 संघटनेने राज्यातील सर्व ग्रामसेवकांचे महाअधिवेशन शिर्डीत आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या महाअधिवेशनासाठी मंत्री महोदयांनी तारीख देवून अधिवेशनात ग्रामसेवकांना मार्गदर्शन करावे तसेच प्रश्न सोडविण्याबाबत कार्यवाही करावी अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.वरील मागण्याची पुर्तता न झाल्यास राज्य भरातील 22 हजार ग्रामसेवक शासनाच्या विरोधात रस्तावर उतरुन आंदोलन करणार अशी माहीती राज्यसरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी लोकमतला दिली.
राज्यातील २२ हजार ग्रामसेवक आंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 3:33 PM