खामगाव येथील एकता नगर भागात राहणारे इम्रान हैदरअली, जुगल शर्मा, अन्वर खान, धीरजसिंग रामसिंग ठाकूर हे चार तरुण १३ सप्टेंबर रोजी देऊळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्प पाहण्यासाठी सायंकाळी ४ वाजेदरम्यान आले होते. यावेळी हे तरुण प्रकल्पाच्या सांडव्यामध्ये उतरले असताना यापैकी धीरजसिंग रामसिंग ठाकूर (२२) या तरुणाचा तोल गेल्याने तो सांडव्याच्या डोहात पडला. यावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो बुडाला. ही माहिती मिळताच गावचे सरपंच संदीप अल्हाट, पोलीस पाटील गजानन पाचपोर, सागर पायघन, शैलेश राठोड, रमेश काळे आणि इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या युवकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. धीरजसिंग रामसिंग ठाकूर या बुडालेल्या युवकाचे वडील आणि इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते. बुडालेल्या युवकाच्या वडिलांनी रात्री उशिरा जानेफळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची गरज
देऊळगाव साकर्शा येथील प्रकल्प नयनरम्य जरी असला तरी या प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येथे काही जण सुटी घालविण्यासाठी जरी येत असले तरी काही तरुण मद्यपानही करण्यासाठी येतात. तेव्हा येथे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्याची गरज आहे.