लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना संसर्गामुळे गत दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १९५ शाळांमध्ये १५ जुलै राेजी घंटी वाजली. काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गत महिनाभरात एकही काेराेना रुग्ण न आढळलेल्या गावात या शाळा सुरू झाल्या आहेत. काेराेना संसर्ग वाढत असल्याने गत वर्षांपासून शाळा बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेंतर्गत काेराेनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी गावातील ग्रामपंचायतींचा ठराव घेण्याचे तसेच पालकांचे संमतीपत्र घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार १९५ गावांनी प्रस्ताव दिल्याने पहिल्याच दिवशी या गावांतील शाळा सुरू झाल्या. गावांनी प्रस्ताव दिल्याने या गावांमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात आल्या. तेराही पंचायत समित्यांचे सभापती, गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत या शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागताने सुरू करण्यात आल्या हाेत्या.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरातच हाेते. गुरुवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हाेता. जिल्हाभरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी ३ हजार ९४० विद्यार्थ्यांची उपस्थिती हाेती. ही उपस्थिती येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. तसेच सुरू करण्यात येणाऱ्या शाळांची संख्याही वाढणार आहे़