चिखली: तालुक्यातील धोडप येथील जि. प. शाळेच्या कार्यक्रमात राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरून भाजपा- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद, दगडफेक आणि आणि वाहनांचे नुकसान प्रकरणात पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून उभय बाजूंच्या जवळपास २५० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान यामध्ये काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे यांचाही समावेश असून पोलिसांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनाही अटक केली आहे.
धोडप येथील जिल्हा परिषद शाळेला आयएसओ मानांकन मिळाल्यानिमित्त तेथे २२ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले आणि काँग्रेसचे आ. राहूल बोंद्रे यांनी आपल्या भाषणादरम्यान टिकाटिप्पणी केली होती. त्यामुळे शाब्दीक वादही झाला होता. त्याचे लोण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले होते. त्यातच भाजपा कार्यकर्ते संतोष काळें यांना मारहाण झाल्याप्रकरणी त्याची तक्रार दाखल करण्यासाठी उभय गट चिखली पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभिर्य पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले होते. या दरम्यान झालेल्या दगडफेकीत चार पोलिस कर्मचारीही जखमी झाले होते. प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी आ. राहूल बोंद्रेंसह, शिवराज पाटील यांच्यासह उभय बाजूंच्या जवळपास २५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये काँग्रेसचे राहूल सवडदकर आणि सचिन बोंद्रे या दोघांना अटक करण्यात आली असून अन्य कार्यकर्ते अद्याप फरार आहेत.
प्रकरणात आशा सिरसाठ यांनी तक्रार दिली असून त्यांचे भाऊ संतोष काळे यांच्या सोबत त्या येवता येथे दुचाकीने जात असताना राहूल सवडतकर, दीपक सवडतकर, सुरेश सवडदकर, गजानन परीहार यांच्यासह तीन जणांनी महाबीज कार्यालयानजीक एका वाहनाने येऊन त्यांना शिवीगाळ केली व संतोष काळे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. सोबतच हातातील अंगठी, गळ््यातील चैन व रोख १५ हजार रुपये हिसकावून घेतले अशी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये प्रतिवादी पक्षातील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पीएसआय तानाजी गव्हाणे हे करीत आहेत.
दरम्यान, दुसर्या गटातर्फे राहूल नंदकिशोर सवडतकर यांनी तक्रार दिली असून खैरव येथील भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून येत असताना मेहकर फाटा येथे सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची गाडी अडवून संतोष काळें, ऋषभ पडघान, शिवाजी पडघान, बबन राऊत, पवन चोपडा आणि अन्य आठ व्यक्तींनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नमूद केले. सोबतच गळ््यातील चार तोळे सोन्याचा गोफ, दहा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या असे एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. सवडदकर यांची महिला नातेवाईक भांडण सोडविण्यास गेल्या असता त्यांना धक्काबुक्की करून विनयभंग करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हंटले आहे. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये दुसर्या गटातील आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तपास पीएसआय मोहन पाटील हे करीत आहेत.
प्रकरणात तिसरी तक्रार पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी दिली असून पोलिस ठाण्यासमोरील जमाव शांत करण्यासाठीचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला. यावेळी जमावाने पोलिसांवर गेलेल्या दगडफेकीत चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. या दरम्यान, पोलिसांच्या वाहनाला व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या वाहनालाही नुकसान पोहोचविण्यात आले, अशा आशयाच्या तक्रारीवरून आ. राहूल बोंद्रे, राहुल सवडतकर, रमेश सवडतकर, बाळू साळोख, सत्येंद्र भुसारी, नंदकिशोर सवडतकर, अतरोद्दीन काझी, डॉ. महम्मद इसरास, प्रदीप पचेरवाल, रफीक कुरेशी, खलील बागवान, सचिन बोंद्रे, तुषार बोंद्रे, व्यंकटेश बोंद्रे, पप्पु देशमुख, अवान जमादार, सचिन शिंगणे, किशोर साळवे, प्रदीप साळवे, अब्दुल वाशिद जमादार, योगेश जाधव, शे. आसीफ, रामभाऊ जाधव, किशोर कुहीटे, गजानन परिहार, दीपक खरात, लक्ष्मण अंभोरे, शिवराज पाटील, ऋषभ पडघाण, संतोष काळें, मनिष गोंधणेंसह सुमारे २०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार गुलाबराव वाघ हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अद्यापही चिखली शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिस संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
नेत्यांनी घेतली एसपींची भेटराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी श्याम उमाळर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, मनोज कायंदे, प्रकाश पाटील यांनी २३ फेब्रुवारीला सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सायंकाळी चिखलीत भेट घेऊन प्रकरणात एकतर्फी कारवाई होत असल्याचे म्हंटले. सोबतच काँग्रेसच्या पदाधिकारी कार्याकर्त्यांवर आकसाने कारवाई होत असल्याचे सांगितले. याबाबत एसपींशी जवळपास एक तास त्यांची चर्चा झाली. मात्र त्याचा फारसा तपशील बाहेर आलेला नाही.