लोणार : खार्या पाण्याच्या सरोवरामुळे संपूर्ण विश्वात प्रख्यात असलेल्या लोणार शहराला पौराणिक तसेच धार्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेले आहे. याच खार्या पाण्याच्या सरोवराच्या काठावर दक्षिण दिशेला मंठा रोडवर गुंधा येथील येऊल यांनी २५0 वर्षापूर्वी प.पू.संत श्री सखाराम महाराज यांच्या हस्ते संकट मोचन गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती. लोणार येथील हे मंदिर प्राचीन असून लोणार शहरापासून काही अं तरावरच मराठवाड्याला सुरुवात होते. पूर्वी मराठवाड्यावर निजामांचे वर्चस्व असल्याने या मंदिरापासून निजामांची हद्द सुरुवात होत होती. तेव्हा लोणारहून मराठवाड्यात सुखरुप जाणे-येणे व्हावे यासाठी याठिकाणी संकटमोचन गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, अशी अख्यायीका आहे. नं तर या मंदिराची येथील रतनलाल संचेती यांनी डागडुजी केली. या मंदिरातील गणरायांची मूर्ती ही अतिशय आकर्षक असून, संकट मोचन म्हणून या गणपतीची परिसरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी दरमहिन्याच्या संकष्ट चतुर्थीला गणेश भाविक भक्त मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. सध्या गणेशोत्सव सुरु असल्यामुळे गणेशभक्तांची दररोज मंदिरात वर्दळ आहे. यामुळे मंदिराला मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे मंदिर शहरापासून थोडया अंतरावर असल्याने रस्त्यावर पहाटे ४ वाजेपासून भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. तसेच आजुबाजुच्या परिसरातूनही मोठय़ा प्रमाणात भक्तगण याठिकाणी येतात. गणेशोत्सवा बरोबरच दरमहिन्याच्या संकष्ट चतुर्थीलाही भाविकांची मांदियाळी येथे जमते.
२५0 वर्षांची परंपरा संकटमोचन गणपती
By admin | Published: September 05, 2014 12:08 AM