बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे; तरीसुद्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरची प्रतीक्षा कायम आहे. गतवर्षी पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी झाल्याने हिवाळ्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरूवात झाली होती. सध्या जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढली असून त्यासाठी टँकर सुरू करणे, विहिर अधिग्रहण करणे याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धांदल उडत आहे. दरम्यान, ९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ११ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याध्ये खामगाव राजा तालुक्यातील पारखेड, आवार, लोणी गुरव, शेलोडी, खुटपुरी, बोरजवळा याठिकाणी टँकर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तर नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार, शेगांव तालुक्यातील लासुर खु., लासुरा बु., सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी खुर्द, दरेगांव येथे टँकरला मान्यता देण्यात आली आहे. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या आठवडाभरामध्ये २६ टँकर टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी दिले आहे.
विहिर अधिग्रहणावरही भर जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थितीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी दरडोई दरदिवशी २० लिटर्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्यात नांदुरा तालुक्यातील सात, मलकापूर व मोताळा तालुक्यातील गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले. तर विहिर अधिग्रहणावरही भर देण्यात येत आहे.
टँकर सुरू करण्यासाठी पशुधनाचाही विचारटंचाईग्रस्त असलेल्या कुठल्याही गावात टँकर सुरू करण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या विचारात घेतली जाते. त्याचबरोबर गावातील पशुधनाचीही संख्या पाहून त्याठिकाणी किती लिटर्स पाणी पाठवायचे याला मान्यता दिली जात आहे. अडीच हजार लोकसंख्या व एक हजार पर्यंत पशुधन असलेल्या गावांसाठी ६५ ते ७० हजार लिटर्स टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर करण्यात येत आहे.