धामणगाव बढे : सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात समाजातील विविध घटकांना आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत सिंदखेड येथे ९ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये २७ युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले.
सिंदखेड येथे संत गजानन महाराज संस्थान व ग्रामपंचायतच्या वतीने शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. सदस्य ॲड. गणेशसिंग राजपूत, संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष अर्जुन कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम, ग्रामपंचायत सचिव राजेंद्र वैराळकर, विकास उजाडे, ग्रा. पं. सदस्य व गावकरी उपस्थित होते. रक्त संकलनासाठी खामगाव येथील रक्तपेढीच्या डॉक्टर राजश्री पाटील व त्यांची टीम उपस्थित होती. रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांचा जि. प. सदस्य ॲड. गणेशसिंग राजपूत यांनी गौरव केला. कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी अशा शिबिराच्या माध्यमातून युवकांनी रक्तदानासाठी समोर येण्याचे आवाहन राजपूत यांनी केले. रक्तदानासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु विविध कारणास्तव अनेकांना रक्तदान करता आले नाही .रक्तदानाच्या प्रतिसादाबद्दल डॉ. राजश्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
संकटकाळी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगत प्रवीण कदम यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
ओळी : रक्तदान शिबिरामध्ये सहभागी युवक.