अमडापूर (चिखली, जि. बुलडाणा) : अमडापूर प्रा.आ. केंद्राला २८ गावे जोडलेली असून, या प्रा.आ. केंद्रांतर्गत चार उपकेंद्रे जोडलेली आहे. तसेच या ठिकाणी शवविच्छेदन गृह व पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ४८ गावातील एमएलसीची जबाबदारी आहे; मात्र येथे दोनपैकी एका डॉक्टरची बदली झाल्याने हा भार एकाच डॉक्टरवर आला आहे.तर यामुळे रुग्णांवर तसेच एमएलसीसाठी पोलिसांवरही भटकंतीची वेळ आली आहे; मात्र सदरचे पद भरण्याकडे संबंधितांचे ६ महिन्यांपासून दुर्लक्ष होत आहे. अमडापूर प्रा.आ. केंद्रामध्ये आरोग्य विभागाकडून दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे; परंतु वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) डॉ. धाटे यांची बदली जुलै २0१४ मध्ये झाल्याने गेल्या ६ महिन्यांपासून सदर पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे बीएएमएस डॉक्टर किरण जाधव यांच्यावरच एवढय़ा मोठय़ा प्रा.आ. केंद्राचा कार्यभार आला आहे. या ठिकाणी शवविच्छेदन गृह बांधलेले असताना येथे एमबीबीएस डॉक्टर नसल्याने प्रेत चिखली येथे न्यावे लागते. तसेच या गावात पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे जोडलेली असल्याने पोलिसांना एमएलसी करण्यासाठी आलेल्या लोकांना चिखली येथे पाठवावे लागत आहे. तसेच एकाच डॉक्टरवर या प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार असल्याने व रुग्णांची गर्दी तसेच डॉक्टरांची सुटी असली तर रुग्णांना आरोग्य सेवा नावालाच ठरते. यामुळे गोरगरिबांना आरोग्य सुविधा न मिळता त्यांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागत आहे; मात्र रुग्णांची गैरसोय होत असताना संबंधितांचे येथील रिक्त जागा भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तातडीने येथील रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे. दरम्यान आ. राहुल बोद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रा.आ. केंद्रातील रिक्त असलेली एमबीबीएस डॉक्टरची रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी प्रयत्न होत असून, याबाबत आरोग्य मंत्र्यांशी बोलणी झाली असून, त्वरित डॉक्टरची नियुक्ती होणार असल्याचे सांगीतले.
२८ गावांच्या आरोग्याची जबाबदारी एकाच डॉक्टरवर
By admin | Published: January 07, 2015 12:27 AM