हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उन्हाळ्यात अनेक गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी पूरक असलेल्या जिल्ह्यातील ८१ लघु प्रकल्पांपैकी ३५ टक्के प्रकल्प अर्थात २९ प्रकल्प मार्च महिन्याच्या मध्यावरच कोरडेठाक पडले आहे. त्यापैकी ३ प्रकल्पावर असलेल्या ६ गावांचा पाणी पुरवठा अवलंबून असल्यामुळे या गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. इतर प्रकल्पातही अल्प प्रमाणात जलसाठा असल्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना त्यामुळे येत्या काळात प्रभावित होण्याची शक्यता असून, टंचाईचे संकट जिल्ह्यात आणखी गडद होण्याची भीती आहे.यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तरी त्याने टप्प्याटप्प्यात ओढ दिल्याने प्रकल्पांमधील जलसाठा तुलनेने कमी होता. त्यातच वातावरणातील उष्मा वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी अवलंबून असणाºया जवळपास १५० गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी दहा टक्के जलसाठा होता. आता तो नऊ टक्क्यांवर आला आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी २२.१७ टक्के जलसाठा होता. आता १८.३२ टक्के जलसाठा आहे. तर ८१ लघु प्रकल्पात ११.६० टक्के जलसाठा होता. आता १० दलघमी जलसाठा आहे. त्यात जवळपास २९ लघु प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. अशा लघु प्रकल्पांमध्ये प्रांगी-केसापूर, मातला, बोधेगाव, पाटोदा, अंचरवाडी-१, कटवाडा, अंढेरा, शिवणी अरमाळ, गारडगाव, पिंप्री गवळी, बोरजवळा, जनुना, देऊळगाव कंडपाळ, खळेगाव, अंभोडा, बोरखेडी संत, हिरडव संत, चायगाव, सावंगी माळी-१, कोल्ही गोलार, वारी-२, व्याघ्रा, लोणवाडी, लांजूड, मांडवा, तांदुळवाडी, केशव शिवणी, विद्रुपा, ब्राम्हणवाड या प्रकल्पांचा समावेश आहे.
या परिसरात तीव्र पाणीटंचाईजिल्ह्यातील ८१ लघु प्रकल्पापैकी शून्य टक्क्यावर पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे त्यावरील हंगामी पाणी पुरवठा योजना यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना असणाºयांपैकी मातला लघु प्रकल्पावरील मासरूळ, शिवणी आरमाळ प्रकल्पावरील पाडळी शिंदे व तीन गाव; तसेच अंढेरा गावाच्या पाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे या गाव परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे इतर उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.
टंचाईचा फेरआढावा टंचाईची तीव्रता वाढत असताना प्रशासन फेरआढावा घेत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १५० गावांना होणारा पाणी पुरवठा तसेच नागरी भागातील टंचाईचा आढावा जीवन प्राधिकरण आणि टंचाई विभाग घेत आहे. अद्याप सिंदखेड राजा पालिकेची यासंदर्भातील माहिती प्रशासकीय पातळीवर उपलब्ध झालेली नाही. माहिती मिळाल्यानंतर नागरी भागातील टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना अंतिम स्वरूप दिले जाईल.