नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे जिल्हय़ातील सव्वा लाखांपेक्षाही अधिक क्षेत्रावरील कपाशीला फटका बसला असून, १ लाख शेतकर्यांना ५00 कोटी रुपयांचा फटका बसल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना सोयाबीन अनुदान योजना २0१६ च्या अर्जामधील त्रुटींमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ८८ हजार सोयाबीन उत्पादक शेतकर्यांपैकी तब्बल २८ हजार शेतकरी प्रतिक्विंटल २00 रुपये प्रमाणे मिळणार्या या अनुदनापासून वंचित राहिले आहेत.त्यामुळे हा जिल्हय़ात कळीचा मुद्दा बनला आहे. त्याची धग थेट कृषिमंत्र्यापर्यंत पोहोचल्याने या प्रकरणी आता संबंधित शेतकर्यांना त्रुटी दुरुस्तीसंदर्भात एक संधी देऊन त्यांना अनुदनाचा लाभ देण्याबाबत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी निर्देशित केले आहे.२५ क्विंटल र्मयादेत बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना प्रतिक्विंटल २00 रुपयेप्रमाणे सोयाबीन अनुदान योजना २0१६ अंतर्गत लाभ द्यावयाचा होता. त्यासाठी बुलडाणा जिल्हय़ातून ८८ हजार शेतकर्यांनी बाजार समितीमार्फत प्रस्ताव दाखल केले होते; मात्र यातील तब्बल २८ हजार शेतकर्यांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळल्याने हे शेतकरी उपरोक्त निर्धारित र्मयादेत या अनुदनापासून वंचित राहिले होते.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची ८ जानेवारी रोजी सभा झाली. या सभेमध्ये प्रकर्षाने हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. सोबतच जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडून संबंधित प्रस्तावाबाबात माहिती घेतली. सोबतच त्रुटी असलेल्या शेतकर्यांना त्या दुरुस्तीसाठी संधी दिली होती की नाही, याचीही शहानिशा करण्याबाबत त्यांनी विचारणा केली होती. त्यावेळी बुलडाणा जिल्हय़ातील तब्बल २८ हजार शेतकरी या अनुदान लाभासून वंचित राहिले असल्याचे समोर आले होते.
बँकांकडूनही दिरंगाईबुलडाणा जिल्हय़ातील ५0 हजार ६८५ शेतकर्यांचे अर्ज या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यापोटी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास १५ कोटी १९ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. यापैकी काही रक्कम ही शेतकर्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जमा झाली आहे. अन्य शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे बँकांनीही यासाठी पुढाकार घेण्याची अवश्यकता आहे. अद्यापही तीन कोटी ८८ लाख २९ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे.
बाजार समित्यांकडूनच प्रस्ताव नाहीजिल्हय़ातील २८ हजार शेतकरी या अनुदान लाभापासून वंचित असले तरी बाजार समित्यांकडूनच यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळेही प्रशासकीय कामकाजात अडचण येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १२ हजार ७९६ शेतकर्यांचे प्रस्ताव अद्याप बाजार समित्यांकडून उपलब्ध झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
त्रुटी असलेल्या प्रस्तावासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव बनविण्यात येत असून, तो राज्य शासनास पाठविण्यात येत आहे. जिल्हय़ातील बाजार समित्यांमधूनच हे प्रस्ताव आलेले नाहीत. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. जिल्हय़ात २८ हजार शेतकर्यांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत.- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा