लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : पावसामुळे मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे भिंत अंगावर पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ९ जून रोजी पहाटेदरम्यान घडली. दरम्यान, या घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अंजनी बुद्रुक येथील मनवरखाँ मस्तानखाँ पठाण (५२) यांच्या घराची भिंत ८ जून रोजी मध्यरात्रीदरम्यान पाऊस सुरू असताना पडली. यामध्ये भिंतीखाली दबल्याने आशिया बी अकबरखाँ पठाण (३) ही चिमुकली गंभीर जखमी झाली होती. तिला पहाटेदरम्यान उपचारासाठी अैारंगाबाद येथे नेत असताना बिबी गावानजीक तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान, या घटनेत मनवरखाँ यांच्या घरात असलेल्या सात जणांपैकी चार जण भितींखाली दबले होते. यात हसीना बी मनवरखाँ पठाण (४७), मनवरखाँ मस्तानखाँ, इम्रानखाँ मनवरखाँ (२७), हे तिघेही भिंतीखाली दबल्याने जखमी झाले होते. स्थानिकांनी त्यांना भिंतीच्या मलब्यातून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.घटनेची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर तलाठी वंदना नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत पंचनामा केला. पावसामुळे घराची भिंत पडल्याने या कुटुंबाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, घरातील संसारोपयोगी साहित्यही नष्ट झाले आहे.
भिंतीखाली दबून ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:31 AM