विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : जिल्ह्याला गत दोन दिवसांत वादळी वार्यासह गारपीटीचा फटका बसला. गारपीटीमुळे खामगाव तालुक्यातील ३० गावे बाधित झाली असून ९३६.६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने प्राथमिक अहवाल पाठविला असून, पंचनामे करण्याला सुरूवात झाली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना खामगाव तालुक्यात अधिकार्यांची पदे रिक्त असून प्रभारींवर कृषी विभागाची धुरा आहे.
जिल्ह्यात गत दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, जोरदार पाऊस होत आहे. खामगाव तालुक्यातील काळेगाव व वझर मंडळाला गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला. मंगळवारी सायंकाळी या भागात वादळी वार्यासह गारपीट झाली. या भागातील कांदा, उन्हाळी ज्वारीसह फळबागांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. यापूर्वी सुद्धा ७ व ८ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात २३९१ शेतकर्यांचे १४७७.६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर सातत्याने अवकाळी पाऊस होत असून, नुकसान होत आहे. या पावसामुळे उन्हाळ्यातील शेतीची कामेही रखडली आहे. शासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाइ देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.खामगाव तालुक्यात अधिकारी, कर्मचार्यांची पदे रिक्त
खामगाव उपविभागीय कृषी अधिकारी यांचे पद रिक्त असून, त्यांचा प्रभार पी. इ. अंगाइत यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असून, प्रभार एस. ए. जगधने यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच कृषी सेवकांचीही अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे काम करताना अधिकारी व कर्मचार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.रोज नुकसान, रोज पंचनामे
जिल्ह्यात गत दहा दिवसांपासून सातत्याने पाऊस येत आहे. दररोज सायंकाळी वादळी वार्यासह पाऊस येतो. तर काही भागात गारपीट होते. या पावसामुळे पिकांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहे. रोज नुकसान झाल्यानंतर त्या भागातील पंचनामे करण्यात येत असल्याचे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी पी. इ. अंगाइत यांनी दिली.
खामगाव तालुक्यात मंगळवारी झालेल्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार ९३६ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले असून, ३० गावे बाधित झाले आहेत. या गावांमध्ये पंचनामे करण्यात येणार असून, पुढील अहवाल आल्यानंतर वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. - अतूल पाटोळे, उपविभागीय अधिकारी, खामगाव.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"