मयूर गोलेच्छा
लोणार : तालुक्यातील हत्ता-तांबोळा परिसरात एका तुरीच्या शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ३०० गांजाची झाडे जप्त केली आहे. सुमारे तीन एकर जागेत ही गांजाची झाडे लावण्यात आलीहोती अशी माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. १२ डिसेंबर रोजी दुपारपासून ही कारवाई सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालू राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अनिल धुमा चव्हाण या शेतकऱ्यास ताब्यात घेतले आहे. त्याने त्याच्या शेतात तुरीमध्ये ही झाडे लावली होती, अशी माहिती समोर येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईत लाखो रुपयांची ही गांजाची झाडे जप्त केली आहेत. दरम्यान या प्रकरणी लोणार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. लोणार तालुक्यातील हत्ता परिसरातील गट क्रमांक १८१ मधील शेतात अनिल धुमा चव्हाण याने तुरीच्या पिकात जागोजागी गांजाची लागवड केल्याचे या कारवाईदरम्यान स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे व त्यांचे सहकारी सध्या घटनास्थळी तळ ठोकून असून शेतात आणखी काही गांजाची झाडे सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता शेत परिसरात विजेची व्यवस्था करून पोलिस आणखी गांजाच्या झाडाचा शोध घेणार असल्याचे समजते. पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. घटना मोठी असल्याने रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता लोणारचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान पोलिस रात्रीच संपूर्ण कारवाई करून पंचनामा करणार असल्याची माहिती आहे.
सहा वर्षांत साडेचार हजार किलो गांजा जप्तबुलडाणा जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांत पोलिसांच्या कारवाईमध्ये तब्बल २ कोटी ६८ लाख ४९ हजार रुपयांचा साडेचार हजार किलो गांजा पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त केला आहे.