ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमधील मागास प्रवर्गातील एकूण ५२ हजार विद्यार्थ्यांपैकी २० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती, तर इतर विद्यार्थी अद्यापपर्यंत शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत होते. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील ३२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक हातभार लावण्यासाठी सामाजिक न्याय विभाग अंतर्गत शिष्यवृत्तीच्या विविध योजना राबविण्यात येतात. विविध महाविद्यालये शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित केल्या जाते. सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाºया या शिष्यवृत्तीचे जिल्ह्यात मागास प्रवर्गातील ५२ हजार लाभार्थी विद्यार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत २० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून, ३२ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. दरम्यान, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम वितरित करण्यास ३ मे रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ३२ हजार विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच वितरित केल्या जाणार आहे. या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. मागासप्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण व परीक्षा शुल्काची रक्कम प्राप्त होऊ न शकलेल्या महाविद्यालय शैक्षणिक संस्थांना केवळ २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी काही अटी व शर्तींवर प्रलंबित रक्कम देण्यात येणार आहे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी आजअखेर लाभ देण्यात आलेले विद्यार्थी वगळून उर्वरित विद्यार्थ्यांच्या पात्र अभ्यासक्रमांसाठी मिळणारी रक्कम ४ आठवड्यात दिली जाईल.
परीक्षा शुल्काची रक्कम मिळणार आॅफलाइन!शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्याची सर्व प्रक्रिया सध्या आॅनलाइन झालेली आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम टाकल्या जाते. त्यानुसार सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कमही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे; मात्र यातील शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम आॅफलाइन दिल्या जाणार आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालय आथवा शैक्षणिक संस्थेला आॅफलाइन पद्धतीने वितरित केली जाणार आहे.
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती लवकरच त्यांना देण्यात येईल. - मनोज मेरटजिल्हा समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा.