लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील मुक्तानंद नगरातील एका शेतात एक दोन नव्हे तर चक्क ३३ नागाची पिले आढळून आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव शहरातील झुणझुणवाला पेट्रोलपंपा मागील मुक्तानंद नगरात मंगेश तायडे यांचे शेत आहे. या शेतातील जुन्या गोबरगॅसच्या टाक्यात मोठ्याप्रमाणात नागाची पिले असल्याचे या भागातिल नागरिकाला दिसून आले. या नागरिकाने सर्प मित्र अक्षय तायडे आणि गोपाल तायडे यांना कॉल केला. दोघांनीही घटनास्थळी पोहोचून सहा ते १२ इंच लांबीची नागाची ३३ पिले पकडली. त्यानंतर याबाबत सर्पतज्ज्ञ अतिश गवई यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात सर्वच सापाची पिले सर्पमित्र अक्षय पाटील, गोपाल तायडे, अविनाश ठाकूर यांनी जंगलात सोडली. मोठ्याप्रमाणात नागाची पिले आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.