विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पोरज : येथून जवळ असलेल्या निमकवळा येथील शेतकरी रामेश्वर राजाराम चीम यांनी शेतात तयार केलेल्या टिनपत्राच्या शेडमध्ये बुधवारी रात्री आग लागली. यामध्ये ३५ क्विंटल कापूस, दुचाकी, तसेच शेती साहित्य जळून खाक झाले. शेतकर्याचे सहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
यावर्षी पावसाचा खंड पडल्याने सोयाबिन व कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. जमिनीमध्ये ओल नसल्याने रब्बी हंगामातही उत्पादनात घट येणार आहे. त्यातच शेतात आग लागून नुकसान झाल्याने रामेश्वर चिम आर`थिक संकटात सापडले आहेत. ३५ क्विंटल कापूस अंदाजे किंमत २,१०,०००, नवीन दुचाकी किंमत ९०,०००, गहू ५ क्विंटल, १ क्विंटल उडीद, १ क्विंटल मुंग, डीएपी खताच्या २ बॅग, पीव्हीसी पाईप ७, शेती अवजारे किंमत २०,००० हजार, दोन पाण्याच्या टाकी जळून खाक झाल्या. तसेच १४ टिनपत्रे व अँगलचेही नुकसान झाले. शेतकऱ्याचे पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, कर्ज, उसने घेतलेले पैसे कसे फेडावे या संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने त्वरीत मदत करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थ करीत आहे. आगीच्या घटनेचा तलाठी अनिल शिंदे यांनी पंचसमक्ष पंचनामा गुरुवारी केला. यावेळी गावातील पोलीस पाटील गणेश काळणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.