लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शासनाच्या हमीदर योजने अंतर्गत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये राज्य शासन बाजार हस्तक्षेप योजना अंतर्गत तूर खरेदी करण्यात येत आहे. यासाठी सुमारे १८०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना अद्यापपर्यंत केवळ ३५० शेतकऱ्यांच्याच तुरीचे मोजमाप करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे व पेरणीचे दिवस पाहता तुरीचे मोजमापाला गती द्यावी, अन्यथा भाराकाँच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी दिला. यावर्षी तुरीचे भाव बाजारात पडल्याने उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना केवळ शासनाच्या हमीदर केंद्राचा आधार आहे; मात्र शेतकऱ्यांच्या घरात अजूनही तूर पडलेली असताना या केंद्रावर तुरीच्या विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या तुरीची नोंदणीसाठी ३१ मे ही अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे; मात्र याआधीचा अनुभव पाहता व तूर मोजणीला होणारा विलंब व परिणामी शेतकऱ्यांना बसणारा भुर्दंड पाहता शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी नोंदणीची पद्धत सुरु करण्यात आली आहे; मात्र हवामान खात्याने मान्सून येण्याची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप तातडीने होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर खरेदी केंद्राला भेट देत जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे तसेच उपजिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याशी याबाबत भ्रमणध्वनीव्दारे चर्चा करीत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी होण्याबाबत मागणी रेटली तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांना केंद्रावर बोलावून त्यांना नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याबाबत मागणी मांडत यासाठी वाढीव वजनकाटे, कर्मचारी वर्ग आदींसह इतर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत आश्वस्त करीत कृउबासला तसे निर्देश दिले. एकूणच पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी व्हावी, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. तसेच आपली तूर खरेदी होईल की नाही, असा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्वच शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी केली जावी, अन्यथा आंदोलनाचा इशारादेखील यावेळी माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी दिला. यावेळी कृउबास सभापती संतोष टाले, माजी जि.प.सदस्य गजानन वाकुडकर, येथील हमीदर केंद्रप्रमुख क्यावल आदींसह कृउबासचे इतर संचालक तसेच शेतकरी आदींची उपस्थिती होती.