- ओमप्रकाश देवकरलोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : जिल्ह्यात मोठा प्रकल्प म्हणून पेनटाकळी प्रकल्पाची ओळख आहे. या पेनटाकळी प्रकल्पावर ३८ पाणीवापर संस्था कार्यरत आहेत. या संस्थेकडे महासंघाची पाणी कर ३६ लाख रुपये थकबाकी आहे. रब्बी हंगामाकरिता पाणी आरक्षणासाठी एकही अर्ज पाणी वापर संस्थेकडे आलेला नाही. पेनटाकळी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पाची ५९ दलघमी एवढी क्षमता आहे. या प्रकल्पावर ३८ किलोमीटरचा एक कालवा असून कोल्हापुरी बंधारे सहा आहेत. या सहा कोल्हापूरी बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० किलोमीटर पर्यंत पाणी नेले जाते. कालवा, उपकालवा, वितरिका, लघु वितरिका यांच्या माध्यमातून ६९ किलोमीटर पर्यंत पाणी नेले जाते. तर १४ हजार २३२ हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाते. या प्रकल्पावर एकूण ३८ पाणीवापर संस्था कार्यरत असून, या संस्थेमार्फत शेतकरी शेती सिंचनासाठी पाण्याचा वापर करतात. त्यांच्याकडे ३६ लाख ५० हजार पाणी कर थकबाकी आहे. कालव्यावर २१० शेतकरी हे पाण्याचा लाभ घेतात. त्यांच्याकडे १९ लाख रुपये, कोल्हापुरी बंधाऱ्यावर ३२५ शेतकरी लाभ घेत असून १७ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ३६ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी आहे. यासोबतच रब्बी हंगामासाठी पाणी आरक्षण करण्याकरीता शेतकऱ्यांनी तात्काळ संस्थेकडे अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी पाण्यासाठी फोनवर मागणी न करता प्रत्यक्ष त्यांच्याकडे असलेली थकीत पाणी कर भरून अग्रिम रकमेसह संबंधित संस्थेकडे अर्ज तात्काळ सादर करावा. जेणेकरून रब्बी हंगामाकरिता पाण्याचे नियोजन करणे सोयीचे जाईल. - राजेंद्र गाडेकर, अध्यक्ष, पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था महासंघ.
पेनटाकळी प्रकल्पातून कालवा व कोल्हापूरी बंधाऱ्याच्या साह्याने जे शेतकरी सिंचन करतात त्यांच्याकडे पाणी कर बाकी आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. - एस. बी. चौगुले, उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प.