बुलडाणा : सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शेतातील कामे बंद आहेत. परिणामी शेतमजुरांच्या हाताला काम नाही. कामाच्या शोधात बरेच मजूर जिल्हा सोडण्याचा विचार करीत असताना जिल्हा प्रशासनाकडून रोजगार हमी योजनांची कामे सुरु करण्यात आली आहेत. यामुळे जवळपास ३६ हजार २४६ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. नरेगा अंतर्गत होणार्या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनुदान दिले जाते. याबाबत प्रत्येक आठवड्यात होणार्या कामाची माहिती घेतली जाते. यानंतर मजुरांच्या खात्यात मजुरी जमा केली जाते. या वर्षी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून विशेष स्वरुपात नरेगा योजनेतून कामांना सुरुवात करण्यात आली. ३१ मार्च २0१६ पर्यंत जिल्ह्यात ८१0 कामांना सुरुवात करण्यात आली असून, यात जवळपास ३६ हजार २४६ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. नरेगातून ग्रामपंचायत स्तरावर ४३९ कामं केली जात आहेत. यात जवळपास २२ हजार २७0 मजूर काम करीत आहेत. इतर विविध विभागांकडून ३७१ कामे सुरू असून, यात १३ हजार ९७६ मजुरांना काम मिळाली आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेकडो मजुरांसाठी काम उपलब्ध नव्हते. परिणामी बर्याच ठिकाणी मजूरवर्गाचे इतर जिल्ह्यात व राज्यात पलायन सुरु होते. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी प्रशासनाकडून कामांची संख्या वाढविण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील मजुरांना मोठय़ा प्रमाणात कामे उपलब्ध झाली आहेत.
३६ हजार मजुरांच्या हाताला काम!
By admin | Published: April 11, 2016 1:22 AM