बुलडाणा, दि. १- जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गापासून ५00 मीटरच्या आत असलेले ३६१ वाईन शॉप, बीअर बार १ एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून ५00 मीटरच्या आत असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्यात येणार असल्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे शनिवारी बुलडाणा शहरातील खामगाव- बुलडाणा रोड, मलकापूर- चिखली रोड, मलकापूर- सोलापूर, धाड रोडवरील सर्व वाईन शॉप व बीअर बार सकाळी उघडण्यात आले नाहीत. जिल्ह्यात सीएल - ३ अनुज्ञप्ती ८२ असून, एफएल - २ अनुज्ञप्ती १६, एफएल - ३ अनुज्ञप्ती २२२, एफएल/बीआर-२ अनुज्ञप्ती ४१ असे एकूण ३६१ आहेत. शनिवारी सकाळपासूनच सर्व दुकाने बंद होती. महामार्गालगत असलेल्या बारमालकांनी १ एप्रिलपासून बार बंद केले असले, तरी नव्या जागेचा शोध सुरू केला आहे. शहरातील मध्यभागी काहींनी आधीच प्लॉट घेऊन ठेवले आहेत. त्या ठिकाणी आता लवकरच बार किंवा वाईन शॉपचे बांधकाम सुरू होणार आहे. तसेच काही बारमालक यातून कोणता मार्ग काढता येईल, यावर विचार करीत आहेत. महामार्गावरील बार बंद असल्यामुळे शहरातील बारवर गर्दी झाली होती.
३६१ वाईन शॉप, बीअर बार बंद
By admin | Published: April 02, 2017 1:39 AM