विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडला होता. त्यानंतर ६ सप्टेंबरपासून नियमित पाऊस होत आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. रात्रीच्या सुमारास ३८ मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत ६२.५७ टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकरी सुखावला आहे.
जिल्ह्यात २२ जुलैपासून तर ५ सप्टेंबरपर्यंत पावसाचा खंड पडला. त्यामुळे पिके सुकली होती. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. ६ सप्टेंबर रोजी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर ७ व ८ सप्टेंबर रोजी रिमझिम पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मलकापूर तालुक्यात ७५ मिमी पाऊस पडला असून, नांदुरा तालुक्यात ५० मिमी, खामगाव तालुक्यात ४२ मिमी पाऊस पडला आहे. २२ जुलैच्या दरम्यान मलकापूरात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी रात्री ७५ मिमी पाऊस पडला. गत तीन दिवस पाऊस झाला असला तरी पिकांना गरज असताना पावसाचा मोठा खंड पडल्याने उत्पादनात घट येणार आहे.
तालुका शुक्रवारी रात्रीचा पाऊस एकूण पाऊस (टक्के)
- बुलढाणा ३९.२ मिमी ४५.७९
- चिखली ३४.२ मिमी ५२.४७
- देऊळगाव राजा २८.३ मिमी ६२.०५
- सिंदखेड राजा २८.२ मिमी ५७.५३
- लोणार ३५.५ मिमी ६०.१५
- मेहकर ३३.५ मिमी ६२.७५
- खामगाव ४२.७ मिमी ५६.४३
- शेगाव ३२.६ मिमी ७६.५९
- मलकापूर ७५.५ मिमी ८७.४७
- नांदुरा ५०.३ मिमी ६५.५५
- मोताळा ३७.९ मिमी ६४.७८
- संग्रामपूर २३.१ मिमी ५९.९९
- जळगाव जामोद ४२.० मिमी ६८.५०